कॉफीमुळे पांड्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये घट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
मुंबई: 
 
करणसोबत कॉफी पित बेताल वक्तव्य करणे हार्दिक पांड्या व लोकेश राहुलला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तसेच त्यांची कारकीर्द धोक्यात आली आहे. आता तर त्यांना आर्थिक फटकेसुद्धा बसू लागले आहेत व त्यांच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये घट झाली आहे. अनेक कंपन्यां त्यांच्यापासून दूर होण्याचा विचार करत आहेत.
 

 
 
पांड्याला पहिला फटका जिलेट मार्कने दिला. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जिलेटने पांड्यासोबतचा करार संपुष्टात आणला. हार्दिकच्या विधानाशी कंपनीचा कोणताही संबंध नाही. त्याचे विधान आमची मूल्ये दर्शवत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही स्वत:ला त्याच्यापासून वेगळे करत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले.
 
हार्दिक पांड्या सध्या 7 ब्रँड्सच्या जाहिरातीत दिसतो. तर के. एल. राहुल स्पोर्ट्स वेअरमधील प्रसिद्ध ब्रॅण्ड पुमा आणि फिटनेस स्टार्टअप क्युअरफिटशी करारबद्ध आहे. या ब्रॅण्ड्सनी अद्याप तरी दोघांवर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.