जनतेचा सरकारवर विश्वास, निवडणुकीत आव्हान नाही राजनाथ सिंह यांची ठाम भूमिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
नोएडा, 21 जानेवारी
देशातील सर्वसामान्य नागरिकांचा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला कुणाचेही आव्हान राहणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह यांनी आज सोमवारी येथे मांडली.
 
भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर मागील साडेचार वर्षांच्या काळात एकही गंभीर स्वरूपाचा आरोप नाही. या सरकारच्या काळात एका पैशाचाही घोटाळा झालेला नाही. त्यामुळे रालोआ पुन्हा एकदा सत्तेत येण्याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असे राजनाथिंसह यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळात दररोज एक नवा घोटाळा उघडकीस येत होता. या सरकारची संपूर्ण दहा वर्षांची कारकीर्द घोटाळे करण्यातच गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 

 
 
लोकसभा निवडणुकीत भाजपाला कुणाकडून आव्हान मिळू शकते, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, कोणत्याही पक्ष किंवा आघाडीकडून भाजपाला आव्हान नाही. भाजपा मजबूत आहे आणि या सरकारवर देशभरातील सर्वसामान्य जनतेचा पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
 
कोलकात्यात शनिवारी आयोजित 22 राजकीय पक्षांच्या महारॅलीविषयी विचारले असता, राजनाथिंसह म्हणाले की, भाजपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सर्वच विरोधकांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. स्वबळावर भाजपाचा सामना करण्याची क्षमता एकाही पक्षात नसल्याने, स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.
चांगली मूल्ये जोपासायलाच हवी
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात चांगली मूल्ये जोपासायलाच हवी. लहान मुलांना शालेय जीवनापासूनच चांगले संस्कार देणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना केवळ चांगले शिक्षण देणे पुरेशे नसते, त्यांच्यावर चांगले संस्कार घालणेही तितकेच महत्त्वाचे असते. समाजाचे कल्याण व्हावे, या विचारांनी प्रेरित होऊन काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीविषयी त्याच्या मनात आदर असायला हवा, असे विचारही राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.