ठाकरे चित्रपटातून 'तो' डायलॉग हटवला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटातील 'हटाव लुंगी' या शब्दांवर सेन्सॉरने  आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या  निर्मात्यांनी या शब्दांच्याजागी दुसरे शब्द वापरले आहेत. 

 
शिवसेना स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी  दाक्षिणात्य लोकांविरोधात विविध आंदोलने केली होती. त्यावेळी 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' अशी घोषणा देण्यात आली होती. हीच आंदोलने ठाकरे चित्रपटात चित्रित करण्यात आली आहेत.  मात्र ‘हटाव लुंगी’ या घोषणेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असल्यामुळे चित्रपटातून 'हटाव लुंगी' शब्द काढून त्याऐवजी 'उठाव लुंगी' असे शब्द वापरण्याची तयारी निर्मात्यांनी दर्शवली आहे.
ठाकरे हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले  आहे. तर, बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत असून, मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहे.