स्लीमनाबाद आणि एक विस्मृत इतिहास
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
एकदा जबलपूरहून मुंबई रेल्वेने प्रवास करत असताना जबलपूरहून सुटलेली गाडी एका छोट्या स्थानकावर पुढे लाईन क्लिअर नसल्यामुळे थांबली. खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिले, स्टेशनचे नाव स्लीमनाबाद असे होते. नाव वाचल्यावर विचारचक्र सुरू झाले, हे नाव भारतीय वाटत नव्हते. स्लीमन + आबाद अशी या नावाची व्युत्पत्ती असावी, स्लीमन हे ब्रिटिश नाव आहे, हा स्लीमन कोण, हा प्रश्न डोक्यात घोळवत मुंबई पर्यंतचा प्रवास केला.
नागपूरला परत आल्यावर स्लीमनाबाद डोक्यातून निघत नव्हते. कार काढून जबलपूरला जाणार नॅशनल हायवे 7 पकडला. जबलपूर सोडून पुढे साधारण 60 कि.मी. वर याच महामार्गावर स्लीमनाबाद गाव लागले. भारतात ब्रिटिश नाव असलेली झारखंड राज्यात डाल्टनगंज (डाल्टन नावाच्या ब्रिटिश सैन्य अधिकार्‍याचे नाव), हिमाचल मधले मॅडलॉडगंज (डोनाल्ड मॅकलॉड पंजाबचा ब्रिटिश लेटनंन्ट गव्हर्नर), आंध्रप्रदेशातले वालटेयर (वाल्टेयर नावाचा ब्रिटिश अधिकारी) ही नावे आठवली. आता हा स्लीमन कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधायचे होते. स्लीमनाबाद येथील एका शासकीय विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षकाची भेट घेतली. त्याने मला स्लीमनाबाद पोलिस स्टेशनवर जायला सांगितले. तिथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिस स्टेशन गाठले. सन 1846 मध्ये बांधलेली मिलीटरीच्या बॅरेकसारखी दिसणारी ही कौलारू वास्तू आहे येथे 1861 पासून पोलिस ठाणे कार्यरत आहे. पोलिस अधिकार्‍याच्या चेंबरमध्ये दोन मोठे फोटो लावलेले दिसले. अत्यंत देखण्या ब्रिटिश व्यक्तीच्या फोटोखाली मेजर जनरल विलियम हेन्री स्लीमन (1788-1856) व तेवढ्याने देखण्या स्त्रीच्या फोटोखाली ‘जोसेफिन विलियम स्लीमन’, असे लिहिलेले होते... आणि मग या स्थानाचा अचंबित करणारा थरारक इतिहास उलगडला.

 
ब्रिटिश गव्हर्नर जनरल विलियम बेंिंटगने मेजर जनरल स्लीमनची नेमणूक ‘ठगी एंड डेकॉइटी डिपार्टमेंट’ च्या पहिल्या सुपरिटेंडेंट पदावर 1835 मध्ये केली. ठग, िंपडारी िंकवा फासीगर ही मध्य भारतात असलेली गुन्हेगारांची जमात होती. हे लोक देवीचा कौल घेऊन समूहाने गावाबाहेर पडायचे. आजचा कन्याकुमारीहून निघणारा व नागपूर जबलपूर मार्गे वाराणसी पर्यंत जाणारा नॅशनल हायवे 7 तेव्हापण होता. या मार्गावर उत्तरेकडे जाणार्‍या तीर्थयात्रींची व श्रीमंत व्यापार्‍यांची वर्दळ असायची. त्या काळी प्रवास समूहात बैलगाडीने िंकवा पायी होत असे. मार्गावर उंची कपडे आणि दागिने घातलेले ठग या व्यापार्‍यांना ‘‘आम्हीपण व्यापारी आहोत. एकत्र प्रवास करणे सुरक्षित राहील.’ असे सांगून सोबत करायचे. या ठगांमध्ये अनेक जण उत्तम गायक होते. रात्री सोयीच्या ठिकाणी हा समूह मुक्कामाला थांबायचा. झोपी जायच्या आधी थोडे मनोरंजन करू, असा प्रस्ताव ठगांकडून यायचा. गाण्याची मैफल जमायची. ठगांचा प्रमुख; गाणी म्हणायचा आणि प्रत्येक व्यापार्‍यामागे एक ठग जागा धरून बसायचा. यांच्या जवळ मोठे रूमाल असायचे त्याच्या मधोमध सुपारी बांधलेली असायची. मैफिल रंगात आल्यावर टोळी प्रमुख संकेत वाक्य जसे ‘हुक्का भरके लाओ’ म्हणायचा आणि त्याच क्षणी व्यापार्‍यांच्या गळ्यांवर मागून रुमाल टाकले जायचे. रुमाल आवळताना सुपारी बरोबर श्वास नलिकेवर बसायची आणि एका क्षणात 50-60 मृतदेह जमिनीवर आडवे व्हायचे...

पुढच्या ठराविक अंतरावर नेमके तेवढे खड्डे खोदून तयार असायचे. व्यापारी आणि तीर्थयात्री यांच्या जवळ असलेला सर्व ऐवज हे ठग हस्तगत करायचे आणि मृतदेह पुरून हे ठग पुढच्या सावजाच्या शोधात निघायचे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी स्लीमनने कोहका (वर्तमान स्लीमनाबाद) गावी 1846 मध्ये इमारत बांधली आणि निवडक सैनिकांसोबत तळ ठोकला. व्यापार्‍यांचा वेष धरून सैनिक प्रवास करू लागले आणि ठगांना पकडण्याचा सपाटा लावला. स्लीमनने सईद अमीर अली नावाच्या ठगाच्या सरदाराला पकडून त्याला माफीचा साक्षीदार करून बोलते केले. त्याच्या जबानीवर इतर टोळ्या पकडल्या. या अमीर अलीने स्लीमनला एक जागा दाखविली जिथे 100 प्रवासी पुरले होते. या काळात ठगांनी 10,000च्या वर प्रवासी लुटून मारले होते. यातल्या बेहराम नावाच्या ठगाने एकट्याने 931 यात्रेकरूंचा खून केल्याची कबूली दिली. स्लीमनच्या या कार्यकाळात 1400च्या वर ठगांना फासावर लटकवले गेले. स्लीमनाबाद पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेले िंपपळाचे झाड या फाशीचे साक्षी आहे. याच झाडावर अनेक ठग दिवसा ढवळ्या फासावर लटकवले. ही दहशत एवढी जबरदस्त होती की ठग जमातीचा पूर्ण नायनाट झाला.
ही मोहीम हाती घेताना स्लीमनने या ठगांचा पूर्ण गहन अभ्यास केला, या विषयावर त्यांनी 3 पुस्तके लिहिली.
1) रामसीयाना - ठगांच्या बोली भाषेचा संपूर्ण शब्दकोष
2) दी ठग्‌स ऑर फासीगर ऑफ इंडिया.
3) रिपोर्ट ऑन डैप्रिडेशन्‌स (डकैती, लूट) कमिटेड बाय दी ठग्‌स ऑफ अपर सेंट्रल इंडिया.
या शिवाय अभ्यासू स्लीमनने एशिया मधले पहिले डायनॉसॉर फॉसिल जबलपूर जवळ लमेटा येथे शोधून काढले. सिवनीजवळ अमोधगढ येथे लांडग्यांनी वाढवलेल्या मुलाची संपूर्ण केस स्लीमनने तपासली, तसेच या प्रकारच्या सहा केसेस स्लीमनने रेकॉर्ड केल्या. या मुलांच्या केसेसवरून प्रेरणा घेऊन रुडयार्ड किपिंलगने जंगल बुक पुस्तकात मोगलीचे पात्र रंगवले.
याच स्लीमनाबाद छावणीत असताना स्लीमनचे लग्न जबलपूर येथे जोसेफिन या सुंदर मुलीशी झाले. बरीच वर्षे मूल बाळ झाले नाही. काही स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव कोहका येथील हरीदास मंदिरात त्याने देवाला साकडे घातले. त्याला नवस लाभला. स्लीमन कुटुंबियांना सहा अपत्ये झाली. या आशीर्वादाची परतफेड म्हणून स्लीमनने जमिनदारांची 100 एकर जमीन विकत घेवून कोहका गाव वसविले. जे आज स्लीमनाबाद म्हणून ओळखले जाते. या मंदिरात स्लीमनने एक मोठी पितळी समई भेट दिली. ती समई आजपण मंदिरात आहे. स्लीमनच्या वंशजांची या मंदिराबद्दल फार श्रद्धा आहे. दरवर्षी स्लीमनचे वंशज इंग्लंडवरून स्लीमनाबादला येतात. स्लीमन आणि जोसेफिनच्या चित्रावर हार अर्पण करतात आणि हरिदास मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन मायदेशी परत जातात.
स्लीमन आपल्या भारतीय कर्मचार्‍यांना आणि गावकर्‍यांना अत्यंत सन्मानाने वागवायचा. स्लीमन ब्रिटिशांच्या सर्व भारतीय राज्य हडपण्याच्या विरोधात असायचा. ज्या राज्यात राजा अत्याचारी आहे अशीच राज्ये ब्रिटिश साम्राज्यात सामिल करावी, सुशासन असलेली राज्ये स्वतंत्र राहू द्यावी, यावर स्लीमन ठाम असायचा. औंध (अवध) राज्याच्या अधिग्रहणाचा लॉर्ड डलहौसीच्या मनसुब्याचा त्याने कडवा विरोध केला होता.
अशा या अभ्यासू मनमिळावू स्लीमनचा मायदेशी परत जाताना प्रवासात 10 फेब्रुवारी 1856 रोजी मृत्यू झाला. नावाच्या कुतुहलामुळे स्लीमनाबादचा हा रोमांचक इतिहास पुढे आल्याने भारावून नागपूरला परत आलो.