मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
मुंबई :
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकासाठी 100 कोटींचा निधीस मंगळवारी (२२ जानेवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. स्मारकाचे बांधकाम एमएमआरडीए करणार असून, सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार असून नंतर सरकार तो खर्च देणार आहे.
 

 
 
बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेशपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यासोबतच महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा  स्मारक समितीच्या नावावर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात होणार आहे.
 
 
 
ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्यात तोडफोड किंवा झाडे तोडण्यात येणार नसल्याचे समितीतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.