नक्षल्यांकडून तिघांची हत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
गावात बॅनरही लावले, खबरी असल्याचा संशय
भामरागड,
पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी कसनासूर येथील तीन ग्रामस्थांची निर्घृण हत्या केल्याची घटना भामरागड ते आलापल्ली या मुख्य मार्गावरील कोसफुंडी फाट्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात बॅनरही लावले. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुड्येटी असे हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत.
 

 
 
१८ जानेवारी रोजी सशस्त्र नक्षलवादी कसनासूर गावात येऊन रात्री १२ वाजताच्या सुमारास ग्रामस्थांना पाठीमागे हात व डोळ्याला पट्टी बांधून घेऊन गेले. त्यानंतर २१ जानेवारीच्या रात्री नक्षलवाद्यांनी दलसू देऊ बोगामी, विनू देवू तलांडे व मुन्शी गट्टी मडावी या तिघांना सोडून दिले. मात्र मालू मडावी, कन्ना मडावी व लालसू कुड्येटी या तिघांची भामरागड ते आलापल्ली मुख्य मार्गावर निर्घृण हत्या केली. या तिघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात बॅनरही लावले. या बॅनरवर म्हटले आहे की, २१ एप्रिल २०१८ रोजी कसनूर- तुमिरगुंडा येथे पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना मारले. या घटनेसाठी दोषी असलेल्या या तीन ग्रामस्थांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. ते तिघेही पोलिसांचे खबरी म्हणून काम करत होते, असे म्हटले आहे.
 
एप्रिल २०१८ मध्ये काय घडले?
भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने २१ एप्रिल २०१८ रोजी रात्रीपासून शोधमोहीम राबवली होती. या दरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून नक्षल्यांवर गोळीबार केला. यामध्ये ४० नक्षलवादी ठार झाले होते. सदर घटनेचा बदला म्हणून नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.