आयसीसी पुरस्कारात कोहलीचे वर्चस्व
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावर्षी आयसीसी पुरस्कारांत इतिहास रचला. विराट कोहलीने एकाच वर्षात आयसीसी क्रिकेटर ऑफ ईयरसाठी दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसह आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ दी ईयर व आयसीसी वन-डे प्लेयर ऑफ दी ईयर पुरस्कारांचा मानसुद्धा पटकावला आहे.
 
 
 
सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी जिंकण्याचे कोहलीचे हे दुसरे वर्ष आहे. कोहलीने२०१७ सालीसुद्धा सर गारफिल्ड ट्रॉफी व आयसीसी वन-डे प्लेयर ऑफ दी ईयरचा पुरस्कार जिंकला होता. तो २०१२ मध्येसुद्धा आयसीसीचा वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू राहिला होता.
विराट कोहली एकाच वर्षी तीन प्रमुख पुरस्कार प्राप्त करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी त्याने आयसीसीच्या कसोटी व वन-डे संघाचा कर्णधारसुद्धा घोषित करण्यात आले होते. आयसीसी पुरस्कारांत कोहलीने कसोटी, वन-डे व सर्व प्रारूपात वर्षाचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे.
 
२०१८ मध्ये फलंदाज व कर्णधार म्हणून केलेल्या बहारदार प्रदर्शनाबद्दल विराट कोहलीला आयसीसीच्या कसोटी व वन-डे या दोन्ही संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
 
 
 
या घोषणेबरोबरच आयसीसीने कोहलीच्या नेतृत्वाला थेट मान्यताच दिली आहे. विराट कोहलीने गतवर्षी खेळलेल्या १३ कसोटी सामन्यात ५५.०८ च्या सरासरीने १,३२२ धावा काढल्या, तर १४ वन-डे सामन्यात १३३.५५च्या दमदार सरासरीने १,२०२ धावा काढल्यात. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये गतवर्षी ५ शतके झळकावलीत, तर वन-डेमध्ये ६ शतके ठोकलीत. भारतीय कर्णधाराने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २११ धावा नोंदविल्या आहेत.
 
आयसीसी मेन्स वन-डे टिम ऑफ दी ईयर २०१८ संघात रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह या चौघांना स्थान देण्यात आले आहे, तर आयसीसी टेस्ट टिम ऑफ दी ईयर 2018 संघात विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांना स्थान देण्यात आले आहे.
 
याशिवाय, ऋषभ पंत याला यंदाचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.
२०१८ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले, तो क्षण चाहत्यांना सर्वाधिक पसंतीस पडलेला क्षण ठरला आहे. दरम्यान, पंच कुमार धर्मसेना यांना या वर्षाचा सर्वोकृष्ट पंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला खिलाडीवृत्ती दाखवल्याबद्दल आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट अवॉर्ड २०१८ पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियाचा फिंच याने केलेली ७६ चेंडूत १७२ धावांची खेळी आयसीसी मेन्स टी-२० परफॉर्मन्स ऑफ दी ईयर २०१८ ठरली.
  
२०१८ आयसीसी मेन्स वन-डे टिम ऑफ दी ईयर 
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, विराट कोहली (कर्णधार), जो रूट, रॉस टेलर, बेन्स स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मुस्तफिजूर रहमान, रशिद खान, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह. 
 
२०१८ आयसीसी मेन्स टेस्ट टिम ऑफ दी ईयर
विराट कोहली (कर्णधार), जेसन होल्डर, कॅगिसो रबाडा, नॅथन लियोन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अब्बास, टॉम लाथम, दिमुथ करुणारत्ने, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केन विल्यम्सन, हेनरी निकोल्स.