अ‍ॅपलच्या कर्मचाऱ्यांनी एका वर्षात दान केले तब्बल 900 कोटी रुपये
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
वॉशिंग्टन, 
मार्टिन लूथर किंग यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या 'गिव्हिंग' योजनेला अ‍ॅपलच्या कर्मचाऱ्यांनी भरभरून पाठिंबा देत 2018 मध्ये तब्बल 890 कोटी रुपये गोळा केले आहेत. गरजूंच्या उत्कर्षासाठी त्यांना वेळ देणे किंवा आर्थिक मदत करणे अशा प्रकारची ही योजना आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांनी 125 मिलियन डॉलर्स (890 कोटी) आणि 2 लाख 50 हजार तास 'अंडर प्रिव्हिलेज्ड' लोकांसाठी काम केले आहे.

 
या कामांतर्गत आयर्लंड आणि इतर भागांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची शक्यता वाढविण्यास मदत करण्यासाठी कोडिंग, रेखांकन, फोटोग्राफी, संगीत आणि व्हिडिओग्राफीसारखे यांसारखे विषय मोफत आणि स्वयंसेवी पद्धतीने शिकविले जातात. तर, जमा झालेले पैसे कल्याणकारी संस्थांना (एनजीओ) दिले जातात. हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आहे. आर्थिक स्वरूपात मिळालेल्या दानाचा सर्वात मोठा फायदा चीनमधील नागरिकांना मिळत असून 32 एनजीओंमार्फत तब्बल 1 लाख 75 हजार नागरिकांना याचा फायदा झाला आहे.