संशयास्पद विमान अपघातानंतर कार्डिफ सिटीचा फुटबॉलपटू बेपत्ता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
नॅन्टीस:
प्रीमियर लीग क्लब कार्डिफ सिटीचा आक्रमक खेळाडू इमिलियानो साला संशयास्पद विमान अपघातानंतर बेपत्ता झाला आहे. अर्जेंटिनाचा जन्म असलेला इमिलियानो साला हा फ्रान्सच्या नॅन्टीस क्लबचा खेळाडू होता, गत शनिवारीच तो 17 मिलियन युरो इतक्या मानधनावर कार्डिफ सिटी क्लबशी करारबद्ध झाला.
 
सोमवारी रात्री इमिलियानो एका छोट्या विमानातून जात होता, ते विमान इंग्लिश खाडीवरून जाताना अचानक रडारमधून गायब झाले. तेव्हा हे विमान गुर्नेसीच्या उत्तेरस 20 कि.मी. अंतरावर होते. मंगळवारी या विमानाच्या शोधकार्यास सुरुवात झाली. दोन हेलिकॉप्टर, दोन विमान व एक लाईफबोट अशा ताफ्यासह शोधपथकाने शोधकाम सुरु केले, परंतु वादळ वार्‍यामुळे शोधकाम थांबविण्यात आले. गायब झालेल्या विमानाचा मात्र थांगपत्ता लागला नाही. सदर विमानाचा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
28 वर्षीय एलिमियानो साला हा 2016 सालापासून नॅन्टीस क्लबशी जुळला होता व त्याने या मोसमात सर्व स्पर्धेतून 13 गोल नोंदविले.
गत शनिवारी इमिलियानोने कार्डिफ सिटी क्लबसोबत साडेतीन वर्षांचा करार केला, तेव्हा तो अतिशय आनंदित होता. त्यावेळी तो म्हणाला की, कार्डिफ सिटीशी जुळल्याचा मला अतिशय आनंद झाला. आता मी आपल्या नवीन संघमित्रांना भेटण्यास व त्यांच्यासोबत सराव करण्यास फार उत्सुक आहो. मी आपल्या संघमित्रांना व क्लबला मदत करण्यासाठी आलेलो आहे.
 
त्याने नॅन्टीस फुटबॉल क्लबच्या संघमित्रांसोबत असलेले छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकून त्याखाली गुडबाय असे लिहिले होते. हाच इमिलियानो सालाचा इन्स्टाग्रामवरील अखेरचा पोस्ट होता.
 
गत 28 ऑक्टोबर रोजी लिसेस्टर सिटी क्लबचे प्रमुख व थायलंडचे कोट्यधीश विचई श्रीवर्धनप्रभा यांचा हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या घटनेच्या तीन महिन्यांनी ही घटना घडली.