वनकर्मचारी व राज्यराखीव दलाच्या जवानांवर सशस्त्र हल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
- मेळघाटातील केलपाणीच्या जंगलातील घटना
- घुसखोरांकडून कु-हाडी,विळे,गोफण व मिरची पावडरचा वापर
- ३० कर्मचारी जखमी, १२गंभीर
अकोट,
मेळघाटातील शेकडो घुसखोर पुनर्वसित आदिवासींनी कु-हाडी, गोफणी, विळे व मिरची पावडरने सामोपचाराची बोलणी करण्यासाठी आलेल्या वनकर्मचाऱ्यांवर मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जोरदार सशस्त्र हल्ला चढविला. या हल्यात वन्यजीव विभाग व राज्य राखीव दलाचे जवान असे सुमारे ३० जण जखमी झाले. या जखमींना तातडीने उपचारासाठी अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर सुमारे १२ गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ अकोल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले. गंभीर जखमींपैकी वनपाल संजय शहाराव इंगोले यांच्या पाठीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. त्यांना विशेष वाहनाद्वारे अकोल्याला हलविण्यात आले. या हल्यात राज्य राखीव दलाचे निरिक्षकही जखमी झाले आहेत.

 
 
जखमी वनकर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती अशी की, मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वनाधिकारी व वनकर्मचारी राज्य राखीव दलाच्या जवानांसोबत सामोपचाराने घुसखोर पुनर्वसित आदिवासींशी बोलण्यासाठी मुळ ग्राम केलपाणीला गेले होते. ही बोलणी सुरू असताना घुसखोर पुनर्वसित लोकांनी वनकर्मचाऱ्यांना गोल घेराव टाकला. दोहोंमध्ये चर्चा सुरू असताना अचानक घुसखोर लोकांनी त्यांच्या जवळील मिरचीची पूड वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यात व अंगावर फेकली. वनकर्मचारी सावरण्याच्या आतच घुसखोरांनी वनकर्मचा-यांवर जोरदार लाठीहल्ला चढवीला. या हल्ल्यांने गांगरुन गेलेल्या वनकर्मचा-यांनी जिवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. त्यानंतर धारगडच्या दिशेने वनकर्मचारी पळत असताना पुनर्वसीत घुसखोर पाठलाग करीत होते. या घुसखोरांनी वनपाल संजय इंगोले यांच्या पाठीवर कु-हाडीने वार केले. या हल्ल्या धारगडचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील वाकोडे सुध्दा गंभीर जखमी झाले, तर राज्य राखीव दलाचे अमरावती गट क्रमांक नऊचे निरिक्षक राजू वाघमारेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उपलब्ध वनकर्मचारी व राज्य राखीव दलाचे जवान जखमी वनकर्मचा-यांच्या मदतीला धावले. या जखमींना तातडीने उपलब्ध वाहनातून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकिय अधिका-यांनी उपलब्ध व्यवस्थेत तातडीने उपचार सुरु केले. सुरुवातीला २० जखमी उपचारासाठी आले. त्यापैकी १२ गंभीर जखमींना अकोल्याला रुग्णवाहिकांमधून पाठविण्यात आले नंतर आठ जखमी रुग्णालयात आणल्याचे दिसून आले. जखमींमध्ये वनपाल संजय इंगोले, वनपरिक्षेत्राधारी सुनिल वाकोडे, निरिक्षक राजू वाघमारे, श्याम देशमुख, एस.बी.घुगे, नितीन राऊत, राजेंद्र बुंगडे, हेमंत सरकटे, शंकर डाखोडे, रामेश्वर आडे, श्रीकृष्ण पवार, रोशन कुडवे, अविनाश जायभाये, कैलास वाकोडे, संतोषसिंह चव्हाण, हरि नागरगोजे, रघुनाथ नेवरे व महिला कर्मचारी सरस्वती डिकार, रामलिला सावल, विवेक येवतकार आदी कर्मचा-यांचा समावेश आहे. या घटनेमुळे वनप्रशासनात खळबळ उडाली असून घुसखोरांची दहशत निर्माण झाली आहे.