वाशीमच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजय चौधरी प्रथम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
वाशीम : 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचा समारोप रात्री उशिरा झाला. यामध्ये प्रथम क्रमांकाचे ५ लाख रुपये बक्षीसाचे मानकरी विजय चौधरी तर दुसर्‍या क्रमांकाचे 4 लाख रुपयाच्या बक्षीसाचा मानकरी महाराष्ट्र केसरी बाला रफीक हे ठरले.
 
या स्पर्धेचे बक्षीस वितरण वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विनायकराव मेटे, वाशीमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, कुस्ती स्पर्धेचे आयोजक नितीन मडके, सहा. पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, नगरसेवक संजु आधारवडे, कैलास गोरे, दिलीप जाधव, सुभाष देवढे यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. 
 

 
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये भारत विरुद्ध जॉर्जिया अशी लढत होणार होती. परंतु, जॉर्जियाचे पैलवान खराब वातावरणामुळे याठिकाणी पोहचू शकले नाही. मात्र, भारताच्या कानाकोपर्‍यातून नामांकीत पैलवानांनी हजेरी लावली होती.
 
प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र पोलिस सेवेत असलेले ग्रामीणचे डिवायएसपी विजय चौधरी व हरयाणाचे पैलवान विजयकुमार यांच्यात लढत झाली. यामध्ये काही क्षणातच चौधरी यांनी हरिणाच्या पैलवानाला चित केले. दुसर्‍या क्रमाांकची लढत सुशिलकुमार हरीयाणा व महाराष्ट्र केसरी बाला रफीक यांच्यात झाली. यामध्ये बाला रफीक यांनी विजय मिळविला. याशिवाय इतरही भव्य बक्षीसाच्या कुस्त्या पार पडल्या. त्यामध्ये 3 लाख, 2 लाख, 1 लाख, 51 हजार रुपये बक्षीसे ठेवण्यात आली होती. याशिवाय वैयक्तीक क्रमांकाचे बक्षीसे देण्यात आली. कुस्तीच्या मैदानावर महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मल्लांनी रसिकांचे लक्ष वेधु घेतले होते.