विरोधकांना फक्त मोदींना हरवायचे आहे : अमित शाह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
कोलकाता : भाजपातर्फे आयोजित पश्चिम बंगालच्या मालदातील जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी कॉंग्रेसह इतर विरोधकांना लक्ष करताना म्हटले की, आम्हाला देशातील गरिबी हटवायची आहे, मात्र सगळ्या विरोधी पक्षांचे फक्त एकच लक्ष आहे ते म्हणजे, मोदींना कसे हरवायचे, त्यांना दिवस रात्र मोदींचीच स्वप्ने पडतात, भाजपाला देशातील भ्रष्टाचार संपवायचा आहे मात्र, विरोधकांना यात कोणताही रस नसून त्यांना मोदीविरोध करायचा आहे.

 
 
ते पुढे म्हणाले की, देशातून रोगराईतून मुक्त करणे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा प्रयत्न असून , विरोधक मात्र मोदींना कसे हरवायचे याचाच प्रश्न पडला आहे, असा घणाघात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी केला.
 
 
 
ज्या पक्षांच्या रॅलीत भारत माता की जय च्या घोषणा केल्या जात नाही , ज्या आघाड्या वंदे मातरम्‌ चा जयघोष करत नसतील, ते काय देशाचा विकास करतील असे शाह  यावेळी म्हणाले .
 
 
बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करा
आगामी लोकसभा निवडणूक ही देशाचेच नव्हे तर पश्चिम बंगालचे भवितव्य निश्चित करणारी आहे. त्यामुळे बंगालला वाचवायचे असेल तर लोकसभेच्या किमान २३ जागांवर भाजपाला विजयी करा. 'ममता सरकारला हटवा, मोदी सरकार आणा', असे आवाहन शाह यांनी केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. २०१९ ची निवडणूक केवळ दोन पक्षांमधील लढाई नाही. ही निवडणूक बंगालची संस्कृती नष्ट करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठीची निवडणूक आहे. अशावेळी तुम्हाला संस्कृतीरक्षक भाजपा हवी की संस्कृती नष्ट करणारी तृणमूल काँग्रेस हवी, याची निवड जनतेनेच करावी, असे शाह यांनी सांगितले.
भाजपाची रथयात्रा निघाली तर आपल्या सरकारची अंत्ययात्रा निघेल, याची ममतांना कल्पना आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी घाबरून रथयात्रेला विरोध केल्याचे शाह यांनी सांगितले.