प्रभात डेअरी कंपनीची 1700 कोटीला विक्री
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
अतिशय आक्रमक मार्केटिंगचे तंत्र अवलंबत अल्पावधीत लोकप्रिय झालेली 'प्रभात डेअरी' आपला संपूर्ण मिल्क प्रोसेसिंग व्यवसाय फ्रांसच्या लॅक्टेलीस या कंपनीला विकणार आहे. यासाठी प्रभात डेअरी आणि लॅक्टेलीसची भारतातील उपकंपनी असलेल्या तिरुमाला मिल्क प्रॉडक्ट्स यांच्यामध्ये 1700 कोटींचा व्यवहार झाला असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 110 रुपयांवर व्यवहार करत होता.

 
नियामक संस्था सेबी आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया कडून परवानगी मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्णत्वास जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे कंपनीचे मुख्यालय आहे. सारंगधर निर्मल यांच्या मालकीच्या असलेल्या प्रभात डेअरीने 2015 साली आयपीओ बाजारात आणल्यानंतर त्याला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र मागील काही दिवसांमध्ये एकंदरीतच व्यवसायात आलेल्या चढउतारानंतर निर्मल यांनी मिल्क प्रोसेसिंग व्यवसाय विकण्याचे ठरविले असून आपले संपूर्ण लक्ष्य पशुखाद्य व्यवसायावर केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या प्रभात डेअरीने अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर येथील निर्मिती केंद्रात चीज, पनीर चीज (कॉटेज चीज) तसेच श्रीखंड अशा मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी स्वतंत्र आणि नव्या यंत्रणेची उभारणी केली आहे. प्रभात डेअरी प्रभात, फ्लावा आणि मिल्क मॅजिक या नाममुद्रेंतर्गत विविध उत्पादने विकते.