शिवाजी पार्कवर 'मी पण सचिन' चे प्रोमोशन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
मुंबई :  
ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावर भारतरत्न 'सचिन तेंडुलकर' ने क्रिकेटचे धडे गिरवले, त्याच मैदानावर क्रिकेट खेळण्याची ‘मी पण सचिन’ या चित्रपटाच्या चमूची इच्छा आज पूर्ण झाली.
 

 
 
या सिनेमाच्या संपूर्ण टीमने आज शिवाजी पार्कवर प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा सामना खेळला. प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवर मात करत, त्यांनी हा अटीतटीचा सामना जिंकलासुद्धा. या वेळी दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘मॅन ऑफ दि मॅच’ तर स्वप्नील जोशी ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ ठरला. या मॅचमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर आणि कल्याणी मुळे यांनी सहभागी होऊन मॅचची रंगत अधिकच वाढवली.
 

 
 
सामना संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने या मुलांसोबत वेळ घालवला. एकंदरच शिवाजी पार्कच्या मैदानात आज एकदम उत्साहपूर्ण वातावरण होते. सर्वसामान्य घरातून आलेली ही मुले अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळतात, त्यात आम्हाला भावी भारतीय टीम दिसते, अशी कौतुकाची थाप या वेळी ‘मी पण सचिन’च्या चमूने दिली. या टीमला ‘मी पण सचिन च्या टीमतर्फे प्रोत्साहनपर सिझन बॅट भेट म्हणून दिली.
 
 
 
इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन श्रेयश जाधव यांनी केले आहे. १ फेब्रुवारीला ‘मी पण सचिन’ हा क्रिकेटवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ध्येयाने झपाटलेल्या एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा यात दाखवण्यात आली आहे.