लक्झरीच्या धडकेत तिघे जागीच ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
अकोला :
येथून मंगरुळनाथ कडे जाणार्‍या भरधाव लक्झरी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अकोला- मंगरुळ मार्गावरील दगडपारवा येथील आयटीआय जवळ बुधवारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत लक्झरी बस पेटवून दिली.
 
 
 
खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणारी बस अकोला येथून मंगरुळनाथ कडे जात होती. याचवेळी दगडपारवा येथून दुचाकीने विरुद्ध दिशेने नितीन प्रकाश राठोड, अनुराधा प्रकाश राठोड व अस्मिता पवार हे येत होते. दरम्यान दगडपारवा गावाजवळ असलेल्या आयटीआयजवळ भरधाव लक्झरी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. या अपघातातील दोघे मायलेक होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी ग्रामस्थांचा मोठा जमाव एकत्र आला आणि संतप्त जमावाने खाजगी बसची तोडफोड केली. जमाव एवढ्यावरच न थांबता जमावाने ही बस पेटवून दिली. घटनेचे वृत्त कळताच बार्शिटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला शांता करणयाचा प्रयत्न केला मात्र, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता अकोल्याहून अतिरिक्त पोलिस कुमक बोलविली आहे.