डायरेक्ट दर्शन : .....
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी,
नारायणी नमोस्तुते!!
शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या सातव्या माळेला रविवारी अचानक आई भवानीच्या दर्शनाचा योग आला.कुटुंबासह तुळजापुरात दाखल झालो.मंदिराच्या परिसरात रीतसर पास घेऊन प्रवेश केला.मंदिर परिसरात भाविकापेक्षा भगवा दुपट्टा गळ्यात टाकून भक्तांना गळाला लावणारी मंडळी जास्त दिसली.पांढरे शुभ्र धोतर,पांढरीच बनियान व प्रत्येकाच्या गळ्यात भगवा दुपट्टा मात्र होताच.कदाचित तो त्यांचा ड्रेसकोड असावा.आल्या आल्याचं इतर भक्तां प्रमाणेच लगेच माझ्या मागे त्यांचा गलका झाला.
 
साहेब,डायरेक्ट दर्शन करायचं?पूजा करायची? साहेब सरळ आत नेऊन सोडतो की? मी म्हटलं नको.आणि सरळ बारीच्या रांगेत उभा झालो.वर चौथ्या माळ्यावर आल्यावर खूप गर्दी झाली.लहानग्या चिल्यापिल्याना कडेवर घेऊन बायाबापड्या ताटकळत उभ्या होत्या.गर्दीत कासावीस झालेल्या चिमुकल्या जीवांना घोटभर पाण्याची पण सोय नव्हती.तिकडे भगव्या दुपट्टे वाल्यांचा जोर वाढलेला.चला.डायरेक्ट दर्शन रु.५०/- प्रति व्यक्ती.आणि इकडे सुरक्षा गार्डने बारी रोखून धरली. तास भर झाला पण गार्ड बारी पुढं जाऊ देईना.इकडे भगव्या दुपट्या वाल्यांचा गलका सुरू होताच.रांगेत ३--४ तास लागतील.चला डायरेक्ट दर्शन बारीतील अनेक भक्त वेळ वाचावा म्हणून डायरेक्ट दर्शनाकडे वळले.दुपट्टेवाले पटापट पैसे घेेऊन लोकांना सोडू लागलेत.उभं राहून मी पण कंटाळलो.मी ही चार व्यक्तीचे २०० /-रुपये देऊन डायरेक्ट दर्शनासाठी वळलो.जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली एकदम पहिल्या माळ्यावर आलो.अन्य माळ्यावर भक्ताची अजिबात गर्दी नव्हती.मग सारे कटकारस्थान लक्षात आले.त्या सुरक्षा गार्डने मुद्यामच बारी रोखायची. अन भक्तांनी कंटाळून डायरेक्ट दर्शनाचा मार्ग अवलंबायचा.म्हणजेच या डायरेक्ट दर्शन कटात सगळेच सहभागी आहेत तर ?
 
आम्ही खाली पहिल्या माळ्यावर पोहचलो .तेथे विचित्रच अनुभव पाहावयास मिळाला.खालीसुद्धा भक्तांची लांबच लांब रांग. तेथे कुठलेही सेवेकरी तुम्हाला मदत करीत नाहीत की पाणी पाजत नाही.उभे राहून पाय गळाले,अनेक चिमुकल्यांना खाली घेऊन बसले.२ तास झाले.मुंगीच्या पावलाने भक्त पुढं सरकत होते.आणि विशेष म्हणजे जेव्हा वरच्या पायऱ्यात भक्त चढतात.तेथे पंखे नाहीत,हवा नाही.त्यामुळे अनेकांचा जीव गुदमरतो.अनेक महिला चक्कर येऊन पडल्यात.पण तेथे साधी वास्त पुस्त करायला कोणी नाही.देवदर्शनात इतक्या मोठ्या प्रमाणात लुबाडणूक मी प्रथमच पाहिली.
विचारपूस केल्यावर कळलं की,जिल्हाधिकारी या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मंदिरात असा कारभार चालावा हे खेदजनक आहे.बिचारे गोरगरीब भक्त,नुकतीच लग्न झालेली जोडपी,नवसाची लहान बाळ घेऊन त्या मायच्या दर्शनाला येतात अन यातना भोगून दर्शन घेतात.
 
या मंदिरात असणारी गैर व्यवस्था सर्वांना खूप खटकणारी बाब आहे.विदर्भातील आमच्या शेगावच्या श्री.गजानन महाराजाचे देवस्थान एकदा समस्त विश्वस्थानी जरूर बघावे.तेथील शिस्त, तेथील स्वच्छता,भक्तांची वास्तपुस्त,बारीतील भक्तांसाठी पाणी,चहा,बसण्याची सोय, औषध ,प्रसाधन व अन्य सोयी. आणि कुठे एक छदामही खर्च नाही.सर्वांना श्रींचे शांततेत विनामूल्य दर्शन होते.म्हणूनच श्री.संत गजानन महाराज संस्थान हिंदुस्थानात एकनंबर आहे.संस्थेचे विश्वस्थ अध्यक्ष शिवशंकरभाऊ पाटील जे निस्वार्थपणे श्रींची सेवा करतात त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो.तुळजापूरची आई भवानी अनेकांची कुलदैवत आहे.त्या मायवर अनेकांची श्रद्धा आहे.बिचारे भक्त तिच्या दर्शनासाठी दूरवरून येतात.त्यांना यातना देऊ नका रे! त्यांची लूट करू नका रे!
शासनाने या तुळजापूर मंदिराच्या व्यवस्थेत लक्ष घालावे व या मंदिरातील कारभारात सुधारणा आणावी अशी एक कळकळीची सूचना आहे......!!
जय मा भवानी.