गोंदिया येथे लवकरच विमान सेवा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
- सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
नवी दिल्ली/ गोंदिया :
केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

 
बडोले यांनी आज उद्योग भवन येथे नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बडोले यांनी गोंदिया येथे विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. उभय मंत्र्यांमध्ये यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया येथे विमान सेवा सुरू करण्याची ग्वाही प्रभू यांनी दिल्याचे बडोलेंंनी सांगितले. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही बडोले म्हणाले.
 
गोंदिया येथे विमान सेवा सुरू झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही बडोले यांनी व्यक्त केला.