सब का साथ, सब का विकास...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
‘सब का साथ, सब का विकास...’ हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिला होता. निवडणुका घोेषित होण्यापूर्वी आणि निवडणुकीच्या प्रचारातही मोदी यांनी हा नारा दिला होता आणि तो देशातच नव्हे, तर देशाबाहेरही लोकप्रिय झाला होता. आता पुन्हा नरेंद्र मोदी यांनी तोच नारा अप‘त्यक्षपणे दिला आहे. या देशातील सवा कोटी जनतेपैकी कुणालाही सकाळ-संध्याकाळ आपल्या देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असे सांगत, मोदी यांनी त्यांच्या सरकारवर असहिष्णुतेचा आरोप करणार्‍यांना चोख उत्तर दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी राज्यघटना देशाच्या सुपूर्द केली, तो 26 नोव्हेंबर हा दिवस मोदी सरकारच्या काळात देशभर शासकीय पातळीवर संविधान दिवस म्हणून धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. आता दरवर्षीच हा दिन शासकीय पातळीवर साजरा केला जात आहे. संविधानात कोणत्याही प्रकारे बदल करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नसल्याचे मोदींनी स्पष्ट केल्याने, गेल्या काही दिवसांपासून जे आरोप त्यांच्या सरकारवर करण्यात येत होते, त्यालाही त्यांनी विराम दिला. त्याचप्रमाणे संविधानाच्या मूळ स्वरूपात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि तसे करणे ही आत्महत्याच ठरेल, असेही मोदींनी वारंवार स्पष्ट केल्याने, विरोधकांच्या अपप्रचारात काही दम राहिला नाही. प्रत्येक वेळी लोकसभेत आणि राज्यसभेत असहिष्णुतेच्या मुद्यावर बोलताना मोदी यांनी पुन्हा एकदा असा राजकीय अजेंडा सादर केला, जो त्यांच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या नार्‍याला पुढे नेणाराच आहे. संविधान आणि असहिष्णुतेच्या मुद्यावर मोदी काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. विशेषत: कॉंग‘ेससह सगळ्याच विरोधी पक्षांचेही त्यांच्या भाषणाकडे लक्ष जर जास्तच असते. मोदी काय बोलतात, काय उत्तर देतात, कशा प्रकारे भूमिका मांडतात, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. मोदी बोलत नाहीत, ते मौनात आहेत, ते फक्त रेडिओवरूनच बोलतात, अशी टीका करणार्‍यांना, त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बोलावे, अशी अपेक्षा होती. मोदी बोलले. पण, टीकाकारांची आणि विरोधकांची निराशा झाली. कारण, पंतप्रधान या नात्याने मोदी यांनी प्रत्येक वेळी आपली स्वत:ची, आपल्या सरकारची आणि पक्ष म्हणून भाजपाची भूमिका अतिशय संयमितपणे मांडली. त्यांच्या बोलण्यात विरोधकांवर तुटून पडण्याची आक‘मकता नसते, आक‘स्ताळेपणा नसतो, कोणत्याही प्रकारचा कडवटपणा नसतो आणि द्वेषभावनेचा तर लवलेशही नसतो. संपूर्ण देशाला मोदी यांची भूमिका आवडते. पण, आपला हेतू साध्य होत नसल्याने विरोधी पक्ष त्यावरही टीका करतात. पण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोदी यांनी जो नारा दिला त्यामुळे त्यांना देशात आणि देशाबाहेर एक नवी राजकीय ओळख प्राप्त झाली. केंद्रात सत्ताबदल होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार आल्यानंतर, देशातील जनतेत असा संदेश जात होता की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कामगिरीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडून नेहरूंवर करण्यात आलेली टीका आणि इंदिरा गांधी यांची करण्यात आलेली उपेक्षा, यावरून भाजपाबाबत तसा संदेश समाजात जात होता. पण, याला कॉंग‘ेसची आडमुठी आणि स्वार्थी भूमिकाही जबाबदार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते फक्त गांधी-नेहरूंमुळेच, असा जो प्रचार कॉंग‘ेसने केला त्यामुळेही काँग्रेसने टीका ओढवून घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अन्य अनेक नेत्यांचेही फार मोठे योगदान होते- आहे. पण, ज्या अन्य अनेकांनी योगदान दिले, त्यांची प्रशंसा केली म्हणजे आपल्यावर टीका करण्यात येत आहे, आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, गांधी-नेहरूंना कमी लेखण्यात येत आहे, ही कॉंग‘ेसची धारणाच मुळात चुकीची आहे.
 
 
 
नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रशंसा करणार्‍यांना नेहरूविरोधी असल्याचे घोषित करण्याची काँग्रेसची वृत्तीच मुळात त्या पक्षाच्या मुळावर उठली आहे. या तीनही नेत्यांसोबत नेहरूंचे मतभेद होते, ही जगजाहीर बाब आहे. असे असतानाही काँग्रेसकडून कारण नसताना गैरसमज करून घेतला जातो. पण, पंतप्रधान मोदी यांनी संंसदेच्या दोन्ही सभागृहांत बोलताना, आतापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांच्या कारकीर्दीची आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करीत मोदी यांनी एकप्रकारे स्वत:कडून शांतता आणि सहकार्याचा प्रस्तावच काँग्रेसपुढे ठेवला आहे. पाहू या काँग्रेस आपल्या भूमिकेत काही बदल करते, की मूळ भूमिकेवरच ठाम राहते. वास्तविक, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आंदोलन झाले, त्यात काँग्रेसशिवाय अन्य अनेक नेत्यांचा समावेश होता. पण, देशाला स्वातंत्र्य मिळून साडेसहा दशकं उलटल्यानंतरही काँग्रेसने कधीच स्वातंत्र्य आंदोलनातील इतर महात्म्यांना बरोबरीचे स्थानही दिले नाही आणि त्यांचा सन्मानही केला नाही. ही बाब काँग्रेसवालेही नाकारू शकत नाहीत. जो दर्जा आणि मानसन्मान काँग्रेसच्या नेत्यांना मिळाला तेवढाच मानसन्मान इतर पक्षांच्या आणि संघटनांच्या नेत्यांनाही मिळायला हवा होता. तो त्यांचा हक्क काँग्रेसने अतिशय मग‘ुरीने नाकारला. आझाद िंहद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खरोखरीच विमान अपघातात मृत्यु झाला होता की ते जिवंत होते, याबाबतचे रहस्यही पंडित नेहरूंमुळेच गुलदस्त्यात राहिले, ही तर सामान्य माणसाचीही धारणा आहे.नेहरू-गांधी परिवारातून देशाला तीन पंतप्रधान लाभले आणि या तिघांनाही भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी तर त्या पंतप‘धान असतानाच भारतरत्न घेतले. स्वत:ला भारतरत्न म्हणून सन्मानित करवून घेताना नेहरूंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण का नाही झाली? या दोन्ही महनीयांचे योगदान नेहरूंपेक्षा कमी होते काय? केंद्रात विश्वनाथ प्रताप िंसग यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आले तर चंद्रशेखर पंतप्रधान असताना सरदार पटेलांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. खरे तर नेहरूंनी स्वत:ला सन्मानित करवून घेण्याआधी या दोन महान नेत्यांना भारतरत्न प्रदान करायला हवे होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग‘ेस पक्षाने सरदार पटेलांना पंतप्रधानपद भूषविण्याबाबत विचारणा केली होती. पण, सरदार पटेलांचे उत्तर ऐकण्यासारखे होते. पक्षाला भलेही मी आवडत असेल, पण देशातील जनता नेहरूंना पंतप्रधानपदी पाहू इच्छिते असे उत्तर देऊन सरदारांनी पंतप्रधानपद नाकारले होते, हे जर वास्तव असेल तर नेहरूंनी पटेलांना आधी सन्मानित करायला हवे होते. पण, मुळातच पटेलांचे नाव मोठे होऊ नये याची काळजी घेणार्‍या नेहरू-गांधी घराण्याने सातत्याने इतरांना कमी लेखण्याचेच कारस्थान केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आताचे पंतप‘धान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे कॉंग‘ेस समर्थन करते की संसदेत असहिष्णू राहण्याच्या भूमिकेवर ठाम राहते, हे येणार्‍या काळात कळेलच.