डोनाल्ड ट्रम्प वापरत असलेली कार भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
मुंबई :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वापरत असलेली अमेरिकन बनावटीची 'कॅडिलॅक एस्केलेड' ही आलिशान गाडी भारतात दाखल झाली आहे. महत्वाचे म्हणजे भारतात पहिली गाडी घेण्याचा मान भिवंडीतील भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी मिळवला आहे.  बॉलीवूडमधिल तारे-तारका आणि अनेक बड्या उद्योगपतींनी वर्षभरापूर्वी या गाडीचे बुकिंग केले आहे. परंतु, पहिली गाडी राज्यातील भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरी आली आहे.
 

 
भिवंडी तालुक्यातील हायवेदिवे येथील अरुण रामचंद्र पाटील यांनी ही आकर्षक 'कॅडिलॅक एस्केलेड' गाडी खरेदी केली आहे. ही भिवंडीकरांसाठी भूषणावह बाब असून ही आकर्षक गाडी पाहण्यासाठी कार प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. 
कॅडिलॅक एस्केलेड ही आलिशान आणि बलाढ्य गाडी आहे. ही गाडी अमेरिकेचे अध्यक्ष वापरतात. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या ताफ्यातील एक महत्त्वाची गाडी मानली जाते. खास अध्यक्षांसाठी या गाडीची निर्मिती करण्यात येते. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोणातून अनेक सोयीसुविधांप्रमाणे परिपूर्ण आहे. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा जास्त सुविधा या गाडीमध्ये आहेत. या गाडीमध्ये ट्रायझोन क्लायमेट कंट्रोल, विशिष्ट लेदरचे सुव्यवस्थित सीट, लाकूड आणि लेदरची मिळून स्टिअरिंग, क्रुज कंट्रोल रिमोट इंजिनसह असंख्य प्रीमियम सोयीसुविधा दिलेल्या आहेत. खास व्हीव्हीआयपी लोकांसाठी बनवण्यात येणाऱ्या या गाडीची किंमत तब्बल ५ कोटी २३ लाख रुपये आहे.