शेती, शेतकरी आणि साहित्यिक...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
आपल्या देशात शिक्षणाला महत्त्व आले ते बिगर शेती क्षेत्रात मिळणार्‍या रोजगाराच्या संधीमुळे, विज्ञानाच्या चमत्कारामुळे. नवीन संशोधनातून नवनवीन उद्योग सुरू झाले. त्याकरिता लागणार्‍या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी ज्ञान देणार्‍या संस्था उभ्या झाल्या. जनतेचा कल मग शिक्षण घेण्याकडे वाढला. त्याआधी एका विशिष्ट वर्गाचाच शिक्षणाकडे ओढा होता. इतर समाजाने त्याकडे पाठच फिरवली होती. कारण, त्यावेळेस शिक्षणाद्वारे अर्थाजर्र्न होण्याची कुठलीही संधी नव्हती. जवळजवळ 90 टक्के जनता शेती व शेतीशी संबंधित व्यवसायाशी जोडली गेली आणि व्यवसायानुसार जाती पडत गेल्या.
समाजात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे साहित्याचाही म्हणावा तसा प्रसार व प्रचार झाला नाही. सर्वकाही मौखिक व्यवस्थेद्वारे समाजात घडणार्‍या घटनांचे वर्णन होत गेेले. बदलत्या काळानुसार धार्मिकक्षेत्रात बदल घडविणार्‍या संतांची परंपरा निर्माण झाली. त्यांच्याकडून समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण झाले. ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ इत्यादी अनेक संतांनी भक्तिमार्गाच्या प्रसारासाठी साहित्यात फार मोठे योगदान दिले. ही सर्व मंडळी खरेतर वेगवेगळ्या जातीची. पण, समाजाने त्यांच्या साहित्याला जातिवाचक झालर कधीच लावली नाही. कदाचित ते ज्या समाजात जन्मले त्या समाजाला त्यांच्या मोठेपणाचा फायदा घेण्यासाठी त्या काळी लोकशाही नसावी.
 
ईश्वरी साधनेबरोबर सामाजिक प्रश्नांचीही संतांनी दखल घेतल्याचे, त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. शेती आणि शेतकरी त्यांच्या अडचणींचा उल्लेख प्रामुख्याने ज्ञानेश्वर, तुकाराम आणि एकनाथ महाराज यांच्या संतसाहित्यात आढळतो. ‘कुळे ऋणे दाटली’ म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज, सावकारी सोडून शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोेडणारे श्री संत तुकाराम आणि शेतकर्‍यांच्या अडचणींचा पाढा वाचणारे एकनाथ महाराज, या तिघांनी शेतकर्‍यांच्या दु:खाला आपल्या अभंगवाणीतून वाचा फोडली.
 
काही काळानंतर शेतीच्या प्रश्नावर जरी कुणी लिहिले नसले, तरी शेतीवर जगणार्‍या जातिसंबंधात लिखाण होऊ लागले. शेतीच्या आर्थिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांना जातीय प्रश्न म्हणून मांडले जाऊ लागले. त्यातूनच दलित, ग्रामीण साहित्य निर्माण झाले. मूळ प्रश्नाकडे डोळेझाक करून प्रत्येक जातीतला नवसाक्षर नवभट म्हणून आपल्या जातीच्या दारिद्र्याचा बाजार मांडून स्वत:चे दारिद्र्य दूर करीत राहिला. दशक्रिया करून पोट भरणार्‍या किरवंतासारखे हे जातीय लिखाण करणारे साहित्यक्षेत्रात साहित्यिक म्हणून आपला टेंभा मिरवीत राहिले.
  
शेतीच्या आर्थिक शोषणामुळे समाजाची अशी दुरवस्था झाली. त्या शेतीला समृद्ध करण्यासाठी काय करावयास पाहिजे यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. या समस्यांवर लिखाण करून सरकारला त्यांनी केलेल्या अन्यायाचा जाब विचारायचे सोडून, सरकारदरबारी हुजरेगिरी करण्यातच या साहित्यिकांनी धन्यता मानली.
 
महात्मा जोतिबा फुल्यांनंतर खर्‍या अर्थाने शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या समस्यांचा ऊहापोह आपल्या साहित्यातून केला. शेतीच्या शोषणामुळेच समाजात आर्थिक दुर्बलता निर्माण झाली, हे सप्रमाण सिद्ध केले. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला समजावून सांगितला. साहित्य प्रेमप्रकरण, कुटुंबसमस्या यातच अडकल्यामुळे आजचे साहित्यिक शरद जोशींना साहित्यिक म्हणून मान्यता देतील काय, अशी शंका येते.
 
साहित्याला शेती व शेतकर्‍यांनी अनेक विषय भरभरून दिले. गावचा पाटील, त्याचा रांगडेपणा, गावाचे दारिद्र्य, त्यातून निर्माण होणारे संघर्ष... एक ना अनेक समस्यांचा वापर करून लिखाण करून, ग्रामीण व दलित साहित्यिक म्हणून आपली पाठ थोपटून घेतली. पण, साहित्यिकांनी शेती व शेतकर्‍यांना काय दिले, असा प्रश्न विचारला गेला तर काहीच नाही, असेच म्हणावे लागेल. शेतीच्या समृद्धीतूनच सामाजिक प्रश्न सुटणार आहेत. तसे लेखन साहित्यिकांकडून व्हावे, एवढीच अपेक्षा!