रेल्वे युवकांना आणखी रोजगार उपलब्ध करणार : पीयूष गोयल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नवी दिल्ली :
येत्या तीन वर्षात 4 लाख युवकांना रोजगार देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे केली. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बेरोजगारी वाढल्याचा आरोप सातत्याने केला जात होता, त्याला रेल्वेतील या मेगाभरतीमुळे प्रत्युत्तर मिळणार आहे.
 
 
 
दीड लाख युवकांना रोजगार देण्याची प्रक्रिया रेल्वेने गतवर्षी सुरू केली असून, येत्या दोन वर्षांत आणखी दीड लाख युवकांना रोजगार देण्यात येणार आहे, याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले की, येत्या दोन वर्षांत एक लाख कर्मचारी निवृत्त होणार असून, त्यांची रिक्त पदेही तातडीने भरली जातील.
 
दीड लाख युवकांच्या रोजगाराची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोनतीन महिन्यात या सर्व युवकांना नियुक्तीचे आदेश मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय जवळपास सव्वादोन ते अडीच लाख युवकांना रोजगार देण्याची प्रकि‘याही लवकरच सुरू केली जाईल. कर्मचारी निवृत्त होण्याच्या आधीच त्यांच्या जागेवर नव्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
२००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या काळात रेेल्वेतून जेवढे कर्मचारी निवृत्त झाले, त्यापेक्षाही कमी कर्मचार्‍यांची नियुक्ती या काळात करण्यात आल्यामुळे रेल्वेत तीन लाख कर्मचार्‍यांची पदे रिक्त झाली आहेत, असे माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रेल्वेने स्पष्ट केले होते. त्यामुळे रेल्वेवर टीकाही करण्यात येत होती.