पंतप्रधानांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्घाटन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नवी दिल्ली : 
 
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ला येथे सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्याहस्ते याद-ए-जालियान, पहिले जागतिक युद्ध, 1857 चा स्वातंत्र्यलढा आणि दृष्टकला संग्रहालयाचेही उद्घाटन करण्यात आले.
 
या संपूर्ण संकुलाचे नामकरण ‘क्रांती मंदिर’ असे करण्यात आले असून, ही क्रांतिकारी आवेश आणि धैर्याला या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 

 
 
या संग्रहालयात सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेशी निगडीत विविध प्राचीन कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये लाकडी खुर्च्या, नेत्यांनी वापरलेल्या तलवारी, पदके, चिन्ह, गणवेष आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.
 
नेताजी बोस आणि आझाद हिंद सेनेवर तयार करण्यात आलेल्या माहितपटामुळे संग्रहालयास भेट देणार्‍यांना स्वातंत्र्यसेनानींचे विचार समजून घेण्यास मदत मिळेल. या माहितीपटाला अभिषेक बच्चन यांनी आवाज दिला आहे. जालियानवाला बाग येथे 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या हत्याकांडाची प्रमाणित माहिती याद-ए-जालियान संग्रहालयातून मिळेल. या संग्रहालयात जालियानवाला बागची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.
 
पहिल्या जागतिक महायुद्धात ब्रिटिशांच्या वतीने लढणार्‍या भारतीय सैनिकांवर सरोजिनी देवी नायडू यांनी लिहिलेली कविताही या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.