शिवसेनेच्या हिदुत्व रॅलीने यवतमाळ शहर दुमदुमले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
यवतमाळ : 
सर्वसामान्य नागरिकांसाठी आपले जीवन अर्पीत करण्याचा मूलमंत्र आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच आपल्याला चालायचे आहे. कितीही अडचणी आल्या तरी घाबरु नका आणि सत्याची कास सोडू नका असा सल्ला आज खासदार भावना गवळी यांनी शिवसैनिकांना दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदुत्व रॅली मध्ये त्या बोलत होत्या.
  

 
 
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कनिष्ठ, वरीष्ठ असा भेद केला नाही. अत्यंत सामान्य कार्यकर्त्यांना सुध्दा त्यांनी मोठया पदावर बसविले. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या मावळयांप्रमाणेच शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी राजकारण करीत आलेली आहे. हाच वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे असेही खा. भावना गवळी यांनी सांगितले.
 

 
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष कांचन चौधरी, श्रीकांत मुनगिनवार, राळेगाव विधानसभेचे संपर्क प्रमुख अंबादास जोशी, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनीही सभेला मार्गदर्शन केले.
 
 
पोस्टल मैदानावर झालेल्या कार्यक्रमानंतर शहरात हिंदुत्व रॅली काढण्यात आली. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. पांढरा ड्रेस तसेच भगवा शेला घातलेले आणि शिस्तबध्द रांगेत चालणा-या शिवसैनिकांनी आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.