राज्यातील दोघांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नवी दिल्ली : 
क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी एंजल देवकुळे हिला, तर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी तृप्तराज पंड्या या महाराष्ट्रातील दोन बालकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी होणार्‍या पथसंचलनात बालक सहभागी होणार आहेत.
 
 
 
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी आणि सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पदक, एक लाख रुपये, 10 हजार रुपयांचे बुक व्हाऊचर आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
यावर्षी पासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार दोन श्रेणींमध्ये वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, कला व संस्कृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या 26 बालकांना यावेळी बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
 
एंजल देवकुळे या 10 वर्षांच्या मुलीला स्क्वे मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्क्वे मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करणारी ती देशातील सर्वात लहान मुलगी ठरली आहे.
मुंबई येथील मुलुंड भागातील तृप्तराज पंड्या या 12 वर्षांच्या बालकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात कमी वयाचा तबलावादक म्हणून गौरविले आहे.