अखेरच्या दोन वन-डेसाठी कोहलीला विश्रांती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नवी दिल्ली :
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यासाठी तसेच त्यानंतर होणार्‍या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड दौर्‍यानंतर भारतीय संघ मायभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी देशात इंडियन प्रीमियर लीग मोसमाला प्रारंभ होणार आहे.
 
 
 
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा २०१८ पासून क्रिकेट मालिकांमध्ये खेळतो आहे. आशिया चषक स्पर्धा वगळता त्याला विश्रांती मिळलेली नाही. त्यामुळे कोहलीच्या एकूण शारीरिक आणि मानसिक ताणाकडे पाहता त्याला या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यात विराटवरील ताण पाहता त्याला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे आहे असे मत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने व्यक्त केले होते. त्यामुळे त्याला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामान्यत त्याला विश्रांती देण्यात आली होती. याशिवाय आशिया चषक स्पर्धेतही विराटला अतिरिक्त ताणामुळे विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.