प्रजासत्ताक दिनराष्ट्रहित सर्वतोपरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झाले. अर्थात आपण भारतीय राज्य घटना स्वीकारून प्रजासत्ताक झालो. गेल्या 70 वर्षांत एखादं धोका सोडला तर भारतातील लोकशाही अगदी सुरळीत सुरू आहे.
स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा अधिकार देतो; तेच संविधान भारत संघराज्याच्या नागरिकांकडून काही अपेक्षा करते.
 
आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो, तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो. ते हक्क आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाहीत, शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संविधानीक अथवा अगदी असंवैधानिक मार्गानेही तो मिळवण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो. संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बहाल केले आहेत.
गणतंत्र आणि नागरिक हे एकमेकांसाठीच बनले आहेत. सुखी, समाधानी, सुरक्षित आणि शांत समाज जीवनासाठी आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडणे हेच प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे. आणि हीच भावना जपत राष्ट्रहित सर्वतोपरी हेच उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक जीवनातील वाटचाल करावी.

 
 
आपण आपल्या अधिकाराची मागणी करीत असताना आपली समाजाप्रती देशाप्रती असलेली कर्तव्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत, याचे भान सर्वांनी पाळल्यास एक सुखी, समृद्ध आणि गौरव गरीमामय व विश्वगुरू भारत पुन्हा उभा राहील, यात शंका नाहीच व राष्ट्र परंवैभवाप्रत जाईल, हाच विश्वास आहे.
राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस नक्कीच साजरा करावा. जानेवारी आणि ध्वजारोहण आणि राजपथावरील भारताची आन बान शान असलेली परेड हे एक वेगळेच समीकरण आहे. एक भारतीय म्हणून हा गौरव सोहळा बघताना अभिमान वाटावा, अशी ही परेड! प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हा सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा. खरंच, गर्व होतो आपण भारतीय असल्याचा..आयुष्यात एकदा तरी जानेवारीची कवायत परेड बघायचीच. दिल्ली गाठायचीच. खरं तर रोजची लढाई, आपण सगळेच लढतो. पण लढायची शिस्त शिकवते, ती ही परेड़! शिस्तीत जगायला शिकतो माणूस, ही परेड बघून! सगळे एक आहोत, सगळे सारखे आहोत.सगळ्यांना बरोबर घेऊन चाललात, की देश पुढे जाणार. सीमेवर लढणार्‍यांची आठवण करून देते, ती ही परेड! कौतुकसोहळा तो देशाचा,तो चुकवायचा नाहीच. भारत माता की जय वंदे मातरम्‌!