सोईचिरो होंडा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
शिक्षणाशिवाय जीवनात यशस्वी होणे अशक्य आहे. अशी मनोधारणा अजूनही सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून आहे. आज आपल्याकडे अशा अनेक व्यक्तींची उदाहरण आहेत की जे शिक्षणात सरस नव्हते. परंतु, आज जीवनात अतिशय यशस्वी आहेत. त्यात अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, सचिन तेंडुलकर, अजय-अतुल, धिरूभाई अंबानी इत्यादी अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. क्षेत्र कोणतेही असो, परंतु त्यात एखाद्याला रस नसेल तर नुसत्या शिक्षणाच्या जोरावर तो यशस्वी होऊ शकत नाही, याउलट, जर एखाद्याला एखाद्या क्षेत्रात रस असेल, परंतु शिक्षणाचा अभाव असेल, तरी सुद्धा तो त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, हे नक्की! याचा अर्थ शिक्षणाला काही अर्थ नाही, असे होत नाही तर आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रात आपण काम करायला हवे. जर कुठल्या परिस्थितीमुळे अथवा आवड नसल्यामुळे आपण शिक्षणात कमी असू तर आपण यशस्वी होऊच शकणार नाही, असा न्यूनगंड मनातून काढून टाकायला हवा.
 
आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीलासुद्धा शिक्षणात मुळीच आवड नव्हती. तरी सुद्धा त्या व्यक्तीने यशाचे शिखर सर केले. ती व्यक्ती म्हणजे ‘सोईचिरो होंडा!’ सोईचिरोचा जन्म 17 सप्टेंबर 1906 रोजी जापानमध्ये झाला. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. त्यांचे वडील म्हणजेच गिही होंडा हे लोहार होते. परंतु, तेवढ्यााने घरचा खर्च भागत नसल्याने ते जुन्या साईकल दुरुस्ती करून विकण्याचे काम करीत असे. घरची परिस्थिती हलाखीची, दोन वेळचे जेवणच मोठ्याा मुश्किलीने मिळायचे, त्यात मुलांना खेळायला खेळणी कुठून मिळणार... त्यामुळे सोईचिरो त्यांच्या वडिलांच्या दुकानातील अवजारांशीच खेळत बसायचा. त्यामुळे त्यात त्याला आवड निर्माण झाली आणि तो वडिलांना साईकल दुरूस्तीसाठी मदत करायला लागला. वडिलांच्या दुकानात मन रमायला लागल्याने तसेच शिक्षणात अजिबात रस नसल्याने वयाच्या 16 व्या वर्षी सोईचिरोने शिक्षण सोडले.

 
 त्यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्रात ‘आर्ट शेकई’ नावाच्या कंपनीत मॅकनिक पदासाठी जागा असल्याची जाहिरात बघितली आणि त्यासाठी अर्ज करायला टोकियोला रवाना झाले. त्या कंपनीत त्यांना नोकरी तर मिळाली. परंतु, त्यांचे वय बघता त्यांना साफसफाईचे काम दिले. मिळालेल्या कामाने त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी कंपनीच्या मालकाला मॅकेनिकचे काम शिकू देण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना दुसर्‍या विभागात काम मिळाले. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काही दिवसांतच ते कामात पारंगत झाले.
 
23 नोव्हेंबर 1924 साली शोकई कंपनीचे पाचव्या जापानकार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि ती कार शर्यतीत पहिली आली. त्यामुळे कंपनी खूप प्रसिद्ध आणि श्रीमंत झाली. आता कंपनी स्वत:च्या शाखा काढण्यासाठी सरसावली. शोकई कंपनीने जापानमध्ये अनेक शाखा काढल्या, त्यापैकी एक शाखा सांभाळण्याची जबाबदारी सोईचिरोला मिळाली. परंतु, 1928 मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. स्वत:जवळचे सर्व भांडवल वापरून ‘टोकई सेइकी’ नावाची कंपनी टाकली आणि मोठ्या कंपन्यांसाठी लागणार्‍या पिस्टन रींग बनविण्याचे काम सुरू केले. टोयोटा कंपनीत पिस्टन रींग देण्याचा सौदा झाला. परंतु, गुणवत्ता चांगली नसल्याच्या कारणावरून टोयोटा कंपनीने पिस्टन रींग घेण्याचे नाकारले. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले. परंतु त्यांनी पुन्हा उभे राहायचे ठरविले आणि कामाला लागले. तेवढ्याात त्यांच्या कंपनीवर दुसर्‍या विश्वयुद्धातील बॉम्ब पडला आणि कंपनी खाक झाली. युद्धामुळे जापानची अर्थव्यवस्थासुद्धा कोलमडली. जनता पायी चालायला मजबूर झाली.
 
लोकांची समस्या बघून सोईचिरोला एक कल्पना सुचली. त्याने एक छोटी मोटार तयार करून साईकलला बसवली, ज्यामुळे लोक कमी पैशांत बर्‍याच दूरवर प्रवास करू शकत होती. त्यामुळे त्या गाडीची मागणी वाढली. बघता बघता होंडा एका मोठ्याा कंपनीचा मालक झाला. तोपर्यंतच्या काळात जापानची अर्थव्यवस्था स्थिरावली होती. मग सोईचिरोने चारचाकी गाडी सुद्धा बनवायला सुरुवात केली. बघता बघता ही कंपनी जगभर प्रसिद्ध झाली. आपण सर्व जण सुद्धा या कंपनीशी परिचित आहोत, ती म्हणजे ‘होंडा’ कंपनी!