पांड्या आणि के. एल. राहुलवरील बंदी मागे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
नवी दिल्ली:
हार्दिक पांड्या आणि लोकशे राहुल यांचे निलंबन आज मागे घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या  (बीसीसीआय) प्रशासक समितीने हा निर्णय घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील न्यायमित्र पी.एस. नरसिम्हा यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला. ११ जानेवारीला हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात बीसीसीआयचा अहवाल आणि निर्णय येणे बाकी आहे. मात्र, तुर्तास निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याचे प्रशासक समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
 

 
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पांड्या याने महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हार्दिकसह लोकेश राहुल याच्यावरही सडकून टीका करण्यात आली होती. यानंतर प्रशासक समितीने दोघांवर  निलंबनाची कारवाई केल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतावे लागले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व लोकेश राहुलच्या पुढील कारकीर्दीचा विचार करता त्यांच्यावर इतकी कठोर कारवाई करु नये, असा सूर उमटत होता.
 
 
दरम्यान, या प्रकारानंतर बीसीसीआयने संपूर्ण संघालाच शिस्तीचे धडे देण्याचा निर्णय घेतला असून, विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या एका समुपदेशन सत्रात संपूर्ण भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंना वर्तणूकीचे धडे देण्यात येणार आहेत.