भारतीय महिलांनीही न्यूझीलंडला नमवले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
नेपियर : 
पुरुष संघापाठोपाठ भारताच्या महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केली आहे. सर्वच आघाड्यांवर भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले १९३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंधाना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २००६ नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना ९ गडी राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

 
 
भारताच्या गोलंदाज एकता बिस्त आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 192 धावांवर माघारी पाठवला. त्यांना दिप्ती शर्मा ( २/२७) आणि शिखा पांडे ( १/३८) यांची उत्तम साथ लाभली. न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. १३ वर्ष्यानंतर भारतीय महिला संघ द्विदेशीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये आला आहे. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर गोलंदाजांनी तिचा निर्णय योग्य ठरवला.
विजयासाठीच्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रीग्स आणि स्मृती मंधाना यांनी गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. २००३ नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. स्मृतीने वन डे कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण करताना १०४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकार खेचून १०५ धावा केल्या. विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना स्मृती माघारी परतली. जेमिमाने ९४ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ८१ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.