शहीद लान्स नायक नाझिर वानीला अशोकचक्र
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
- दहशतवाद सोडून लष्करात झाला होता सहभागी
नवी दिल्ली,
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढा देताना आपल्या सहकार्‍यांना वाचविताना वीरमरण पत्करणारे लान्स नायक नाझिर अहमद वानी यांना ‘अशोक चक्र’ या देशाच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
नाझिर वानी हा आधी दहशतवादी होता. काश्मीर खोर्‍यातील अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता, पण वडिलांनी मनपरिवर्तन केले आणि नाझिर 2004 मध्ये शरण आला. जम्मू-काश्मीर सरकारच्या धोरणानुसार त्याचे पुनर्वसन करण्यात आले. त्याच वर्षी नाझिर भारतीय लष्करात भरती झाला. लष्करात आल्यानंतर देशसेवेचे महत्त्व त्याला पटले आणि देशभक्ती त्याच्या रक्तात भिनली. दहशतवाद समाजाला विशेषत: तरुणाईला लागलेली सर्वांत मोठी कीड आहे, याची जाणीवही त्याला झाली आणि दहशतवाद ठेचण्याचा निर्धारच त्याने केला.
 

 
गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरमध्ये शोपियॉं जिल्ह्यातील बाटगुंड लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे सहा अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी मोहीम उघडली होती. यात लान्स नायक नाझिर वानीचाही समावेश होता. अतिरेक्यांचे पळण्याचे मार्ग रोखण्यासाठी वानीच्या नेतृत्वात एक पथक गठित करण्यात आले. वानीने आपल्या सहकार्‍यांसह एका बाजूने आघाडी सांभाळली. अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार केला असता, भीषण चकमक झडली. यावेळी वानीने दोन अतिरेक्यांना ठार केले. लपून बसलेल्या एका अतिरेक्यांनी इतर जवानांवर गोळीबार केला असता, वानीने तो आपल्या शरीरावर घेतला आणि सहकार्‍यांचे प्राण वाचविले. वीरमरण पत्करताना वानीने त्या अतिरेक्याचाही खातमा केला. उर्वरित जवानांनी अन्य तीन अतिरेक्यांना ठार केलेे. या चकमकीत नाझिर वानी मात्र शहीद झाले.
 
 
यापूर्वी, दहशतवादविरोधी अनेक लढ्यांमध्ये बजावलेल्या अद्‌भूत शौर्यासाठी नाझिर वानी यांना दोन वेळा सेना पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांना पहिल्यांदा सेना पदक प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्येही त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
 
 
पहिलाच प्रसंग 
दहशतवादाचा मार्ग सोडून भारतीय लष्करात सहभागी झालेल्या आणि देशाची सेवा करताना शहीद होणार्‍या जवानाला देशाचा हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होय.