वेणुगोपाल धूत, दीपक कोचर यांच्या कार्यालयांवर छापे-3250 रुपयांच्या कर्जघोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा गुन्हा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
नवी दिल्ली,
प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत याच्या व्हिडिओकॉन समूह, तसेच दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) 3250 रुपयांच्या कर्जघोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर सीबीआयने व्हिडिओकॉन आणि नूपॉवर रिन्युएबलच्या मुंबई आणि औरंगाबादमधील कार्यालयांवर छापे मारले.
 

 
 
आयसीआयसीआय बँकेच्या कर्जप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती आहेत. सीबीआयने वेणुगोपाल धूत यांच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर सकाळपासून छापे मारले. या कार्यालयांमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
 
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिले आहे. दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने साह्य करावे यासाठी हे कर्ज देण्यात आले असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याच आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला एकूण 20 बँकांच्या समूहाने 3250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के इतका होता. त्यावेळी चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी होत्या. कर्जाच्या बदल्यात धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवर कंपनीत 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दीपक कोचर यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती असा आरोप एका सहभागधारकाने केला होता.
सीबीआयने काही महिन्यांपूर्वी धूत आणि दीपक कोचर यांची इतर प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी केली होती.