इस्रो लॉन्च करणार जगातील सर्वांत हलका उपग्रह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
इस्रोने  कलामसॅट- व्ही2 या उपग्रहाचे आज रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हा आतापर्यंतचा वजनाने सर्वांत हलका उपग्रह असल्याचा इस्रोचा दावा आहे. याचे वजन फक्त १.२६ किलो आहे. मुख्य म्हणजे हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनवला आहे.
विद्यार्थ्यांनी भविष्यात इंजिनिअर किंवा वैज्ञानिक व्हावे यासाठी हा उपग्रह प्रेरणास्त्रोत ठरेल असा विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला आहे. 
 
 
श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोचे  प्रमुख के. शिवन याबाबत म्हणाले की, "हा उपग्रह सर्वाधिक हलका आहे. आतापर्यंत अशा उपग्रहाची निर्मिती झाली नाही आणि अशा प्रकारचा उपग्रह कक्षेत देखील सोडला गेला नाही." कलामसॅट बरोबरच मायक्रोसॅट हा उपग्रह देखील प्रक्षेपित केला जाणार आहे.
 
या उपग्रहाचा उपयोग दळणवळणासाठी होणार आहे. याआधी एका भारतीय विद्यार्थ्याने ६४ ग्रॅमचा उपग्रह तयार केला होता. हा उपग्रह नासाने प्रक्षेपित केला होता. पण हा उपग्रह अवकाशाच्या कक्षेत सोडला गेला नव्हता तर उपकक्षेत सोडण्यात आला होता.
 
 
या प्रकारच्या उपग्रहाला सब- ऑरबिटल स्पेसफ्लाइट म्हणतात. या स्पेसफ्लाइटचे असे वैशिष्ट्य असते की ते तांत्रिकदृष्ट्या अवकाशात तर पोहोचतात पण कक्षेत जात नाहीत. पण कलामसॅट हा कक्षेत जाईल असे संशोधक सांगतात.
या उपग्रहाची निर्मिती चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या फर्मशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ९ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
आतापर्यंत अवकाशात जे सॅटेलाइट सोडण्यात आले आहेत त्यासाठी जे रॉकेट वापरले गेले त्यांचे अवशेष पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. कधीकधी हे पार्ट अवकाशात एकमेकांना भिडतात. त्यामुळे अवकाशवीरांनाही त्रास भोगावा लागतो, असे त्यांनी सांगितले. 
पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल (PSLV) या प्रक्षेपकाप्द्वारे हे दोन्ही उपग्रह कक्षेत सोडले जातील. त्याचे वजन 260 टन आहे.
 
 
या मोहिमेचे अनोखे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे वापर झालेल्या रॉकेटचा पुनर्वापर केला जाईल. एका अर्थाने हे पुनरुज्जीवनच म्हणावे  लागेल, असे  शिवन यांनी स्पष्ट  केले.