नवाझ शरीफ कारागृहात बनले शायर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
लाहोर,
कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या स्वत:चे हाल सांगण्यासाठी प्रख्यात उर्दू शायर मिर्झा गालिबच्या शायर्‍यांचा आधार घेत आहेत. भेटीस येणार्‍यांना ते गालिबच्या शायर्‍या ऐकवून, आपल्या व्यथा सांगत असतात.
 

 
लाहोर येथील कोट लखपत मध्यवर्ती कारागृहात शरीफ यांना डांबण्यात आले आहे. त्यांना सेवाकरीही नाकारण्यात आल्याने, स्वत:ची कामे ते स्वत:च करीत असतात. हृदयात दुखणे उन्मळून आल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारानंतर बुधवारी सायंकाळी त्यांना पुन्हा कारागृहात आणण्यात आले.
 
 
आज गुरुवारी कारागृह अधिकार्‍यांनी, शरीफ यांना भेटणार्‍या लोकांची यादी तयार केली आणि त्यानुसार त्यांची भेट घडवून आणली. यावेळी लोकांनी शरीफ यांना त्यांच्या एकूणच प्रकृतीविषयी विचारणा केली असता, त्यांनी गालिबचा शेर विशद केला. ‘उन के देखे से जो आ जाती है मुंह पर रौनक, वो समजते है के बीमार का हाल अच्छा है’ असा हा शेर होता. जिओ न्यूजने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.