सिनेट सभागृहात ‘शट डाउन’वर मतदान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
अमेरिकेत मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या 'शट डाउन'वर मार्ग काढण्यासाठी एका प्रस्तावावर मतदान घेण्याचे अमेरिकन सिनेट सभागृहामधील नेत्यांनी मान्य केले आहे. मात्र, या मतदानानंतरही कोंडी फुटण्याची शक्यता कमी असल्याचे मानण्यात येत आहे.

 
अवैध स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी कोट्यवधी डॉलरच्या निधीचीही त्यांनी मागणी केली आहे. मात्र, अमेरिकन काँग्रेसमधून त्याला विरोध असून, प्रतिनिधीगृहामध्ये विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. आर्थिक प्रस्तावच रोखून धरल्यामुळे, 'शट डाउन' सुरू झाले आहे आणि सरकारी संस्थांचे कामकाज अंशत: बंद झाले आहे. या पार्श्वभूमीर, सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे नेते मिच मॅककनेल आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चक शुमर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सिनेटमध्ये मतदान घेण्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले. कोंडी फोडण्याच्या दृष्टीने यावर एकमत झाले आहे. यामध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात येतील. पहिला प्रस्ताव मेक्सिको सीमेवरील भिंतीसह सर्व सरकारी संस्थांसाठी निधी उपलब्ध करण्याविषयी असेल. तर, दुसऱ्या प्रस्तावामध्ये आठ फेब्रुवारीपर्यंतच्या निधीसाठीची उपाययोजना असेल. या दोन्ही प्रस्तावांना सभागृहाची मंजुरी मिळण्यासाठी किमान ६० मतांची गरज असेल. विशेष म्हणजे, आठ फेब्रुवारीपर्यंतच्या निधीविषयीच्या प्रस्तावाला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असून, डोनाल्ड ट्रम्पही त्यावर सही करण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
'शट डाउन'च्या पृष्ठभूमीवर, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभिभाषणावरूनही आता वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांचे २९ जानेवारी रोजी अभिभाषण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी लोकप्रतिनिधीगृहातील अभिभाषणाचे नियोजन रद्द केले असून, त्याचे फेरनियोजन करण्याची विनंती व्हाइट हाऊस केली आहे. मात्र, ट्रम्प अभिभाषणावर ठाम असून, दोन्ही सभागृहासमोरून किंवा अन्य कोणत्याही ठिकाणाहून ते भाषण करणार, हे निश्चित झाले आहे. त्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भाषण लिहिण्याचीही तयारी करण्यात येत आहे, असे वृत्त 'वॉशिंग्टन पोस्ट'ने प्रसिद्ध केले आहे.