उमेश यादवच्या भेदक माऱ्यासमोर केरळचा धुव्वा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019

नागपूर: 
उमेश यादवच्या वेगवान भेदक माऱ्यासमोर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याच्या पहिल्याच दिवशी केरळच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले असून केरळचा संपुर्ण संघ अवघ्या 28.4 षटकांत 106 धावांवर बाद झाला. तर विदर्भ संघाने आपल्या पहिल्या डावात पाच गडी गमवित 171 धावा केल्या. 
वायनाड येथील कृष्णानगरी स्टेडियमवर आजपासून सुरु झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून गोलंदाजावर विश्वास दाखवित क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो विश्वास गोलंदाजांनी सार्थक ठरविला. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या दुसऱ्याच षटकाच्या दुसèया चेंडूववर केरळला पहिला धक्का अवघ्या 9 धावांवर बसला. उमेशच्या चेंडूवर फटका मारण्याचा नादात अझरुद्दीन आठ धावांवर यश ठाकूरला झेल देऊन बसला. यानंतर पुढील षटकांत उमेशच्याच चेंडूवर फलंदाजीला आलेला सिजमोन जोसेफ हा संजय रामास्वामीला झेल देऊन बसला. उमेशने एकामागे एक भेदक मारा केरळच्या फलंदाजावर सुरु केला. तर दुसèया बाजूने रजनीश गुरबानी याने देखील त्याला साथ दिली. 27 धावा असंताना केरळला तिसरा धक्का रजनीशने दिला. रजनीशच्या चेंडूवर 9 धावांवर असलेला सलामी फलंदाज पी राहुल हा फटका मारण्याच्या प्रयत्नात फैजला झेल देत बाद झाला.
  

 
 
प्रत्येक षटकांत बाद करण्याचे सत्रच उमेशने सुर केले. उमेशच्या चेंडूवर यानंतर आलेला के. बी. अरुण कार्तिक 4 हा यष्टीरक्षक अक्षय वाडकरला झेल देऊन बसला. दुसरीकडे चिवट खेळणाऱ्या कर्णधार सचिन बेबीला 22 धावांवर रजनिशने त्रिफळा चित केले. यजमानांचा निम्मा संघ अर्धशतकाचा पल्लाही न गाठता तंबूत परतला. उमेश यादवच्या वेगवान आक्रमणासमोर केरळचे पुढील फलंदाज अशस्वी झाले. केरळचे इतर फलंदाज थोड्या अंतराने बाद झाल्याने यजमानांचा डाव शंभरचा पल्लाही गाठणार अशी चिन्हे होती.पण एकाकी झुंज देणाऱ्या विनोदने शेवटचा फलंदाज एम. डी. निधीशसोबत सावधरित्या खेळी करीत शंभरचा पल्ला संघाला गाठून दिला. दरम्यान पहिल्या सत्रातील बारावे षटक टाकणाऱ्या रजनीशने निधीशला 6 झेलबाद करून केरळचा पहिला डाव 28.4 षटकात 106 धावांवर संपुष्टात आणाला.
 
106 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार फैज व संजय रामास्वामी या दोघांच्या सलामी जोडीने विदर्भाच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली करून संघासाठी 33 धावा जोडल्या असतांना विदर्भाला याच धावांवर पहिला धक्का लागला. एम. डी. निधीशच्या चेंडूवर संजय 19 धावांवर त्रिफळाचित झाला. यानंतर अनुभवी फलंदाज वसिम जाफर फैजला साथ देण्यास आला. दोघांनी सावधरित्या खेळी करून संघाला प्रथम अर्धशतक आणि नंतर शतकाचा उंबरठा पार करून दिला. दोघांच्या भागिदारीला 80 धावा होताच विदर्भाला  वसिमच्या रुपात दुसरा धक्का बसला. खेळपट्टीवर जम बसविलेल्या फैजने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 170 धावा पूर्ण झाल्यानंतर विदर्भला लागोपाठ 3 धक्के मिळाले. वारियरच्या चेंडूवर फैज अझहररुद्दीनला झेल देऊन बसला. फैजने 142 चेंडूचा सामना करून 13 चौकार झळकावित 75 धावा पूर्ण केल्या. यांनतर फैजने तळातील रजनीश गुरबानीला खेळपट्टीवर बोलाविले. परंतु, बसिलच्या चेंडूवर रजनीश भोपळाही न फोडता अझरुद्दीनला झेल देऊन बसला. तर 23 धावांवर असलेल्या अर्थवला वारियरने बाद केले़ पहिल्या दिवसअखेर विदर्भाने 45 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा करून 65 धावांची आघाडी घेण्याबरोबरच सामन्यावर पकड पक्की केली. गोलंदाजीत एम. डी. निधीश व संदीप वारियरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 
 संक्षिप्त धावफलक: 
केरळ : पहिला डाव :  28.4 षटकांत सर्वबाद 106, सचिन बेबी 22, बसील थम्पी 10, विष्णु विनोद नाबाद 37.
विदर्भ गोलंदाजी : उमेश यादव 7-48, रजनीश गुरबानी 3-38.
विदर्भ- पहिला डाव- 45 षटकांत 5 बाद 171 फैज फजल 75, वसिम जाफर 34, अर्थव तायडे 23, आदित्य सरवटे खेळत आहे..
केरळ गोलंदाजी : संदीप वारियर 2-46, एम. डी. निधीश 2-53, बसील थंम्पी 1-38.