जगभरात दरवर्षी तयार होतो पाच कोटी टन इलेक्ट्रॉनिक कचरा – जागतिक आर्थिक मंच
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा हे जगासमोरचे एक नवीन आव्हान असून दरवर्षी जगभरात पाच कोटी टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो, असे जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) म्हटले आहे.
 
 
ई-कचरा हा आर्थिकदृष्ट्या एक ओझे तर आहेच मात्र तो आपल्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी मोठा धोकाही आहे. वर्ष 2050 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे प्रमाण 12 कोटी टनापर्यंत पोचण्याचा अंदाज असून हा कचरा आतापर्यंत जगात जेवढे व्यावसायिक विमान बनले आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त असेल असे या अहवालात म्हटले आहे.
 

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे डब्ल्यूईएफची बैठक सुरू आहे. या निमित्ताने संयुक्त राष्ट्राच्या ई-कचरा संघटनेसोबत मिळून डब्ल्यूईएफने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी 62 अब्ज डॉलरचा कचरा निर्माण होत आहे. जगभरात होणाऱ्या चांदीच्या उत्पादनापेक्षा हे दुप्पट प्रमाण आहे. एवढेच नव्हे तर एक टन मोबाईल फोनमध्ये एक टन खनिज सोन्यापेक्षा 100 पट जास्त सोने असते, असेही या अहवालात म्हटले आहे.
 
 
दर वर्षी केवळ 20 टक्के इलेक्ट्रॉनिक आणि प्लॅस्टिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया होते. यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाला नुकसान तर होतेच मात्र यातून 62 अब्ज डॉलरची कमाईसुद्धा होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.