मणिकर्णिका-कंगना रनौत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
‘‘मै अपनी झॉंसी नही दूंगी,’’ पुन्हा एकदा झाशीच्या राणीचा आवाज तिच्या अभिनयातून साकार झालेल्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झॉंसी!’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतभर दुमदुमू लागला आहे.
‘कंगना रनौत!’ होय! आपल्या अभिनय कौशल्यानं नेहमीच वेगळेपण जपणारी ही अदाकारा इतिहासातील राणी लक्ष्मीबाईला दमदारपणे रूपेरी पडद्यावर साकार करायला निघाली आहे. खरंच, एका छोट्याशा गावातून मुंबईपर्यंतची कंगनाची एकाकी झुंज आज तिला आकाशउंचीवर घेऊन गेलीय्‌.
युग सोशल मीडियाचं आहे. कुठलीही कलाकृती जन्माला जरी येत असली नव्हे, कुणाच्या मनात तरी असली, की लगेच सार्‍या जगाला माहिती होतेय्‌. सिनेमाबाबत म्हणलं तर रिलीजच्यापूर्वीच आता आकर्षक, दमदार ट्रेलर यू-ट्युबला पाहायला मिळतात. त्यात एखादी कलाकृती अशीही असते की- ज्याचा ट्रिझर िंकवा ट्रेलर यू-ट्युबला येताच ती कलाकृती सर्वांच्या चर्चेचा, विशेष आकर्षणाचा विषय होतो.
 
‘मणिकर्णिका’ या चित्रपटाबाबतही तेच झालंय्‌. ‘मणिकर्णिका’ची ट्रेलर रिलीज होताच, 26 जानेवारीच्या पर्वावर रिलीज होणार्‍या या सिनेमाची आज सर्वत्र चर्चा आहे.
चर्चा याकरिताही आहे, की- नेहमी आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी चर्चेत राहिलेली कंगना रनौत हिची राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात यात प्रमुख भूमिका आहे, तसेच दिग्दर्शनाचा काही भागही कंगनाने सांभाळला आहे.
‘‘मै लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हॅू, जब तक मेरे शरीर मे रक्त है, मै पूर्ण निष्ठासे झॉंसी की सेवा करूंगी....’’ हे वाक्य जेव्हा पाहणार्‍यांच्या कानावर पडते, तिचा अभिनय डोळ्यांनी दिसतो, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. झॉंसी ताब्यात घेण्याच्या क्रूर मनसुब्याने जेव्हा इंग्रजांनी झॉंसीवर चढाई केली, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी उलट इंग्रजांवर ‘हल्लाबोल’ केला. राणी लक्ष्मीबाई 1857 च्या लढ्याची स्फूर्तिदेवता आहे, या देवतेकडून आजही आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते.
अशा राणी लक्ष्मबाईच्या प्रतिमेला आपल्या प्रतिभेनं न्याय देणं, तितकंच सोपं नाहीच. पण नेहमी वेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या कंगनानं हे आव्हान पेललं आहे.
‘देश से प्यार तो, हर पल यह कहना चाहिए
मै रहू या ना रहू, भारत ये रहना चाहिए....’
 
राणी लक्ष्मीबाईंचं मनोगत आणि इतरांसाठीही प्रेरणा बनणार्‍या या ओळी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातील एका गाण्यातील आहेत, ज्यामुळे देशप्रेमाविषयी एक मोठं वातावरण तयार होतं आणि उर भरून येतो.
भांबला (सिमला, हिमाचल प्रदेश) या छोट्याशा गावात कंगनाचं बालपण गेलं. पहाडांच्या प्रदेशात असणार्‍या या गावात थिएटर कधीच नव्हते. त्या गावाला सिनेमा माहिती नव्हता. पण अगदी लहानणीच स्वत:मधील अभिनयाची जाणीव झालेल्या आणि जीवनात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द असलेल्या कंगनानं अभिनयासाठी दिल्ली गाठली आणि तेथून थेट मुंबई!
 
सुरुवातीच्या काळात मुंबईत अनेक भल्या बुर्‍या परिस्थितीचा सामना करीत 2006 मध्ये ‘गँगस्टर’ यातील भूमिकेसाठी तिला ‘फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड’ मिळाला आणि मग तिने मागे वळून पाहिले नाही.
अनेक दर्जेदार चित्रपट तसेच ‘क्वीन’ या चित्रपटासाठी तिचा विशेष गौरव झाल्यानंतर कंगना आणखी नवीन काय करतेय्‌, याची वाट असतानाच ‘मणिकर्णिका’च्या माध्यमातून कंगना पुन्हा येतेय्‌. इतिहासातील राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य, तलवारबाजी, लढाई इत्यादी साकारताना आपल्या दमदार आवाजातून ‘‘हम लढेंगे, की आनेवाली पिढी आझादी का उत्सव मनाये! ’’ या ओळी साकार करताना या अभिनेत्रीने या कलाकृतीला न्याय दिला आहे, हे या ट्रेलरवरूनच समजते.
‘मणिकर्णिका’ची खासियत जर सांगायची झाली, तर कंगनाचा अभिनय तर आहेच, शिवाय तिचं राणी लक्ष्मीबाईंसारखं दिसणं, तो पेहराव, आणि देशप्रेमानी ओतप्रोत भावनिक स्वरातील तिचा आवाज होय.
 
‘मणिकर्णिका’बद्दल आपुलकी सर्वांनाच आहे, पण मराठी माणसाला या कलाकृतीबद्दल आपुलकी वाटण्याचे कारण म्हणजे-छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यात दाखविली असून ‘हम लढेंगे और छत्रपती शिवाजी महाराज के राज के सपने को पुनजीर्वित करेंगे....’ असा करारी संवाद ऐकायला मिळतो.
 
कंगना तिच्या गावापासून, दिल्लीला काही दिवस थिएटर करत मुंबईपर्यंतच्या तिच्या प्रवासात एकाकी होती. या प्रवासात तिचे नाव आदित्य पंचोली, ऋत्विक रोशन या सारख्या नावांशी जोडल्या गेले. प्रसंगी ती त्यासाठी बदनामही झाली, तिने मनस्तापही सहन केला. पण सिनेमा आणि त्यातील आपली भूमिका याकडेच तिने आपलं लक्ष्य ठेवलं. आणि म्हणूनच आज तिच्यासाठी हा दिवस आलाय्‌.
‘मणिकर्णिका’मध्ये एक संवाद आहे,
‘जब बेटी उठ खडी होती है
तभी विजय बडी होती है.....’
‘मणिकर्णिका’करिता तिला खूप सार्‍या शुभेच्छा!