आणिबाणीतील संघर्षनायिका......माझी आई- वसुधा पांडे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 रोजी अचानक आणिबाणी घोषित केली आणि सारा देश बंदिशाळेत परिवर्तित झाला. सरकारच्या विरोधात जे बोलत होते व स्वतंत्रपणे विचार व्यक्त करत होते, त्यांचा आवाज दाबून टाकण्यात आला व त्यांचा काही अपराध नसताना कॉंग्रेस शासनाने त्यांना कारागृहात पाठवले. एकप्रकारची दडपशाही व दंडेशाहीच सुरू झाली. सारा देश हादरला. आपल्याच देशात आणि आपल्याच सरकारने स्वत:च्या स्वार्थाकरिता दडपशाही सुरू केली. सर्वत्र अन्यायाचे थैमान सुरू झाले. परिवार उद्ध्वस्त होऊन, नोकर्‍या व कामधंद्यावर गदा कोसळली. त्या विरोधात ‘ब्र’ काढण्याची मनाई होती. रा. स्व. संघाच्या सेवकांनी व राजकीय नेत्यांनी सत्याग्रह केला. त्यांना राजद्रोही ठरवले गेले. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. जेलमध्ये जावे लागले. या अंधकारमय कालखंडात, ज्या स्त्रियांचे पती सुदैवाने प्रत्यक्षात तुरुंगात डांबले गेले नव्हते त्यांनाही हालअपेष्टांचा, मानहानीचा सामना करावा लागला. त्यांच्या कामधंद्यावर परिणाम झाला व काहींच्या नोकर्‍या गेल्या. त्या गृहिणींना व कुटुंबाला सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक यातना सहन कराव्या लागल्या. घरी असलेले पुरुषही तळहातावर शिर घेऊनच होते. कारण सरकारची वक्रदृष्टी केव्हा होईल, याचा नेम नव्हता. अशा अनेक स्त्रियांमध्ये होती- वसुधा वसंत पांडे म्हणजे आमची आई!
 
आमचे पांडे कुटुंबतर संघकार्याकरिता प्रसिद्धच होते. माझे आजोबा डॉ. ब. ग. पांडे, माझे बाबा, काका सारेच संघप्रिय विचारांचे व सक्रिय कार्यकर्तेच होते. बाबा गीतप्रमुख म्हणून संघगीतांना चाली लावून म्हणत व शिकवत असत. आईचे मामा वाशीमचे स्व. अॅड. नारायणराव धनागरे व मामेभाऊ अमरावतीचे स्व. प्रा. प्रभाकर धनागरे यांना अटक झाली होती व नागपूर जेलमध्ये डांबले होते. सर्वच दिशा अंधारमय होत्या.

 
 
माझे वडील धरमपेठ कॉलेजमध्ये संगीताचे प्राध्यापक होते. धरमपेठ कॉलेजचे प्रिन्सिपल स्व. विनायकराव फाटक यांना पकडून तुरुंगात डांबले होते. संपूर्ण धरमपेठ संस्थाच बंद पडली होती. सर्वांचे पगारही बंद होते. बाबांचाही पगार बंद होता. आम्ही सर्व भावंडे लहान होतो व शाळेत शिकत होतो. लहान बहीण अवघी दोन वर्षांची होती. बाबांच्या संगीताच्या ट्युशन क्लासच्या भरोशावर कसेबसे दिवस निघत होते. जवळची जमापुंजीही संपत होती. भाजी आणणेही परवडत नसावे, कारण कधीकधी तर पावसाळ्यात अंगणात उगवलेली घोळ, चवळी, तरोटा या भाज्यांचा उपयोग आई, भाजी म्हणून करायची. आमचे घर मोठे व सुरक्षित म्हणून स्वयंसेवकांच्या गुप्त बैठकी, विचारविनियम होत असे. रात्री सारे लाईट बंद करून मंद प्रकाशात काही विचार व ठराव होत असत. सवयीप्रमाणे बैठकीनंतर नाश्ता करावा लागेल, याची कल्पना असल्यामुळे आई काहीतरी हुडकून काढून तयार करीत असे. तांदळाच्या चुरीचादेखील उपयोग होत असे. रात्रीबेरात्री घराभोवती फिरून पोलिस कानोसा घेत. आम्हा मुलांना, बाहेरच्या लोकांना काय उत्तरे द्यायची, हे पढवून ठेवले होते. स्व. बबनराव देशपांडे आमच्याकडे मुक्कामाला होते. कोणी विचारल्यास हे आईचे काका आहेत, आमचे आजोबा आहेत, असे आम्ही सांगत होतो. आईने तसे आम्हाला पढवून ठेवले होते.
 
अशा भीषण, वादळी परिस्थितीतही आई डगमगली नाही. आमचे शिक्षण व संस्कार यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. तिच्यावर आलेल्या कठीण प्रसंगांची झळ आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. ते समजण्याचे आमचे वयही नव्हते. बाहेरचे वातावरण मात्र फार क्लेशकारक होते. कारण आमचा काहीही अपराध नसताना वाळीत टाकल्याप्रमाणे आमच्याशी सर्व वागत होते. शेजारी, नातेवाईक आणि विशेषत: सरकारी नोकरीत असलेली माणसे व कुटुंबे आमच्यापासून चार हात दूरच राहात होते. आमच्याशी बोलणे टाळीत होते. त्या वेळी आम्हाला फार वाईट वाटायचे. पण, आई आम्हाला धीर देऊन म्हणायची- ‘‘आपण कुणाचे वाईट केले नाही िंकवा काही गुन्हा केला नाही, त्यामुळे आपल्याला भिण्याचे काहीच कारण नाही. एक दिवस सारे खरे समोर येईलच. कर नाही त्याला डर नाही. घाबरायचे नाही. नीट शाळेत जायचे आणि अभ्यास करायचा.’’ आम्ही मुलेही आईचे ऐकत होतो. घरात नेमके मात्र काही सुरू आहे आणि आई कशाच्या तरी िंचतेत असते, हे कळत होते.
 
दर दिवाळीला आई-बाबा आम्हाला दुकानात नेऊन नवीन कपडे घेऊन द्यायचे. त्याप्रमाणे आई आम्हाला घेऊन धरमपेठेतील आमच्या ठरावीक दुकानात गेली, पण दुकानदाराने चक्क नकार दिला. ‘‘साहेबांचा पगार सुरू नाही. उधारीवर मी कपडे कशाच्या भरोशावर देऊ?’’ असे त्याचे उत्तर ऐकून आईला काय वाटले असेल ते आता कळते. त्या वर्षी आम्ही दिवाळी मनवली नाही. जखमेवर मीठ चोळावे तसे आमचे शेजारी, नातेवाईक आम्हा मुलांना विचारीत असत, ‘‘भाजी काय खाल्ली? दूध, तूप खाल्ले का? दिवाळीत गोड काय काय खाल्ले?’’ सर्वांची उत्तरे ‘हो’ म्हणून द्यायची, असे तिने सांगून ठेवले होते. ती अतिशय स्वाभिमानी होती. त्या काळातही डगमगली नाही.
 
स्वत:च्या अडचणी व दु:ख बाजूला सारून ती अशा दु:खी माता-भगिनींच्या मदतीला धावून जात असे. त्यांचे मानसिक बळ वाढवून अनेक ठिकाणाहून मदत मागून ती योग्य ठिकाणी गुपचूप पोहोचवत असे. काही लोक ती दिसताच, कुठून आली पीडा, असे म्हणून दारे बंद करीत असत. हा अपमान पचवून ती परत परत जाऊन बाहेरील परिस्थितीची जाणीव करून देत असे. सरकारच्या स्वत:च्या स्वार्थामुळे सामान्य जनता कशी पिचली आहे, याची जाणीव करून देत असे. दुपारच्या वेळी काही मैत्रिणींना बरोबर घेऊन प्रचार करण्याचे काम करताना तिला समाधान मिळत असे. समाजासाठी काही केल्याचे व दिवसाचे चीज झाले, असे तिला वाटत असे. कुणाला पटले तर थोडीफार मदत मिळे, पण महिलांमध्ये जागृती निर्माण होत असे. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ यावर तिचा विश्वास होता.
 
सणासुदीला घरोघरी जाऊन प्रचार करून दसरा, दिवाळी, होळीला पुरणपोळ्या आमच्या भगिनी आणून देत, त्या सहीसलामत जेलमधील आपल्या बांधवांना पाठवल्या जात. संक्रांतीला तिळगुळाचे लाडूही जमवून पाठवले जात. रा. स्व. संघाप्रमाणेच राष्ट्रसेविका समितीवरही बंदी होती. राष्ट्रभक्ती-राष्ट्रकार्य हा गुन्हाच ठरत होता. धरमपेठेतील गोदामा केंद्र समितीचे स्थान बंद झाले होते. एकत्र जमून जाता येत नसे. शेवटी ‘जानकी निवास धरमपेठ’ येथे श्रीरामजी जोशी यांच्याकडे अंतरा अंतराने भगिनी जमत असत. ध्वजवंदना, प्रार्थना, विचारविनिमय व योजना कळत असत. आत गेल्यावर चपलादेखील लपवून ठेवाव्या लागत. कानोसा घेऊनच बाहेर पडावे लागे. हे सारे ती उत्साहाने, उत्स्फूर्तपणे व न घाबरता करीत असे. जे सर्वांचे होईल ते आपले होईल, असे ती म्हणत असे. या सर्व िंचताग्रस्त काळात तिने आमची आबाळ केली नाही. बाबा व आजोबा बिस्तर बांधून तयारच होते. सरकारची वक्रदृष्टी केव्हा होईल, याचा नेम नव्हता. पण, ती अतिशय कणखर होती. कोंड्याचा मांडा करून आम्हाला भरवत होती. या काळात मात्र गरिबी काय असते आणि भूक म्हणजे काय, हे सारे आम्हाला कळत नसले तरी काहीतरी गंभीर गोष्ट आहे ज्यामुळे घरातील ज्येष्ठ काळजी करतात, हे कळत असे. म्हणून आई एवढी धडपड करते आहे, चुपचाप कुणाकडे जाऊन भेटीगाठी घेते, हे कळत होते. पण, आमचा संसर्ग होऊ नये म्हणून लोक चार हात दूरच राहात होते. तिला याचे आश्चर्य वाटे की, लोकशाही राष्ट्र असूनही लोक चूप का आहेत? सर्व जण तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करतात? अर्थातच ‘परदु:ख शीतल’ असतं. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ हे अगदी सत्य आहे. पैसा जवळ नाही, हातात कामधंदा नाही आणि घरात जबाबदारी तर कमी होऊ शकत नाही, अशा वेळी ‘बाप बडा न भैया सबसे बडा रुपय्या!’ हे खरे ठरते. या सर्वांवर मात करण्याकरिता मनोबल आवश्यक होते.
 
रोज संध्याकाळी देवासमोर सांजवात लावून ती आम्हाला शुभंकरोती कल्याणम्‌, रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणायला सांगे. रोजचा अभ्यास नीट करवून घेई व छान छान गोष्टी सांगून आपला मायेचा पदर आमच्यावर पसरीत असे. सारा भार तिच्यावर सोपवून आम्ही परीराज्यात मस्त भ्रमण करीत असू.
‘‘देवावर श्रद्धा ठेवा. तो सर्वसाक्षी आहे. सत्य-असत्य, न्याय-अन्याय सारे जाणतो. सत्कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहात नाही.’’ प्रामाणिकपणा, चिकाटी, मेहनत, देशप्रेम यावर तिचा भर होता. त्यामुळेच ती सारे सहन करू शकली. आमचा अभ्यास व सुसंस्कार यावर लक्ष दिले म्हणून आम्ही जीवनात यशस्वी ठरलो. आम्ही भावंडेही आज कितीही कठीण प्रसंग आले तरी घाबरत नाही. त्यावर धीराने कशी मात करायची, हे तिनेच शिकवले. तिच्यातला कणखरपणा आमच्या कामी येतो. त्या काळाने बरेच काही शिकवले. चांगले-वाईट अनुभव दिले.
 
आजही ती भावविभोर होऊन ते अनुभव आम्हाला सांगत असते, तेव्हा अभिमानाने आम्ही तिच्यासमोर नतमस्तक होतो. तिच्या दृढ विश्वासाप्रमाणे शेवटी अन्यायाला वाचा फुटली. न्यायाचा विजय झाला. अनेक संकटांना तोंड देत व घरे उद्ध्वस्त करून एकदाची आणिबाणी संपली. आईसारख्या अनेक माता-भगिनींना त्रास सहन करावा लागला. पण, सोन्यासारख्या तावूनसुलाखून त्या नेटाने उभ्या राहिल्या. या संघर्षनायिकांना त्रिवार वंदन!