डोळ्यांची काळजी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
आपल्या मिळालेली देवाची एक सुंदर देणगी म्हणजे डोळे. डोळ्यांमुळेच आपल्याला बाहेरचे सुंदर जग दिसू शकते. ज्ञान व अनुभव मिळतो, सौंदर्य खुलते. सतेज, निरोगी डोळे सुदृढ शरीराचा आरसा असतात. या सुंदर देणगीला जपणे फार महत्वाचे. आजकाल तासन्‌तास कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट, व्हिडियोगेम, टी.व्ही.  वापरामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 4-5 वर्षांच्या मुलांपासून डोळ्यांवर चष्मा दिसायलालागला आहे. त्यामुळे डोळ्यांसाठी योग्य पौष्टीक आहार व इतर गोष्टी जसे तपासणी, डोळ्यांचे व्यायाम इत्यादी अत्यंत महत्वाचे आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’, जीवनसत्व जे अँटिऑक्सिडंट्‌स आहेत तसेच ओमेगा - 3 चरबी हे भरपूर प्रमाणात आवश्यक आहे. गाजर हे बीटा कॅरोटीन (अ - जीवनसत्व) चे उत्तम स्त्रोत असल्यामुळे डोळ्यांसाठी सर्वोत्तम. हे बीटा कॅरोटीन डोळ्यांच्या आतील पटलाची झीज होण्यापासून रोखतात. शिवाय यात ‘क’ जीवनसत्व आणि िंझक देखील असते. इतर भाज्या जसे ढोबळी मिरची, हिरव्या पालेभाज्या, रताळे, ब्रोकोली, यात भरपूर ‘अ’, आणि ‘क’ जीवनसत्व असते. फळांमध्ये संत्रे, किवी, चेरी, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, िंलबू, मोसंबी, पेरू यातील ‘क’ जीवनसत्व मोतीिंबदू आणि मॅक्युलाची (आतील पडदा) झीज होण्यापासून रोखतात. पपई, आंबा, पेरू यात ‘अ’ जीवनसत्व असते. जे रातआंधळेपणा आणि रेटीनाचे आजार यापासून संरक्षण देतात. बदाम आणि गव्हांकूर यात विटॅमीन ‘ई’ असते. ओमेगा - 3 चरबी ही देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची. ती मास्यांमध्ये खूप जास्त तर
स्ट्रॉबेरी, पेरू, जवस यात थोड्या प्रमाणात असते.
 
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक आहारासोबतच इतर गोष्टी देखील कटाक्षाने पाळणे महत्वाचे असते. डोळ्यांची नियमित तपासणी तज्ञांकडून करून घेणे, नंबरचा चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स बनवून घेणे व नियमित वापरणे इत्यादी. लहान मुलांच्या दृष्टीच्या समस्येकडे त्यांच्या शिक्षकांकडून माहिती घेऊन, तसेच मुलांना विचारून ताबडतोब इलाज करून घेणे याकडे पालकांनी जरुर लक्ष द्यावे. डोळ्यांचे बरेच आजार आनुवांशिक असतात. त्याबद्दलची माहिती मोठ्यांकडून जाणून घेणे व त्यानुरूप इलाज करणे. प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांना खूप नुकसान होते. याचे अल्ट्राव्हायलेट किरण कोणत्याही ऋतूत डोळ्यांना नुकसान करू शकतात. त्यामुळे सकाळी व दुपारी चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरणे अत्यंत आवश्यक असते. उन्हाळ्यात होणारा डोळ्यांचा दाह कमी करायला झोपण्यापूर्वी 10 मिनिटे काकडीचे काप मिटलेल्या डोळ्यांवर ठेवावे थंड वाटते.
 
डोळ्यांचे व्यायाम तज्ञांकडून शिकून घेणे व रोज करणे त्यामुळे डोळ्यांच्या आतील मांसपेशी आणि रक्तस्त्राव चांगला राहतो. खूप कमी प्रकाशात लिहिणे, वाचणे टाळावे. तसेच खूप जास्त प्रखर प्रकाशाकडे बघू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही औषध, ड्रॉप्स टाकू नयेत ते हानिकारक होऊ शकते. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणार्‍यांनी 15-16 तासांच्या वर सतत वापरू नये. झोपतांना व पोहतांना लेन्स जरूर काढून ठेवावेत त्यामुळे डोळ्यांच्या आतील भागाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. कॉम्प्युटर तसेच टि.व्ही बघतांना दर 25-30 सेकंदांनी डोळ्यांची उघडझाप करणे व नजर दुसरीकडे नेल्यामुळे डोळ्यांवर अतिजास्त ताण येत नाही तसेच डोळ्यांच्या आतील ओलावा टिकून राहतो. ह्या काही साध्या गोष्टी अंमलात आणून आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य टिकवू शकतो.