नारायण सुर्वे यांच्या कवितेमधील स्त्री
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
मराठी कवितेतला एक महत्त्वाचा दीपस्तंभ म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे हे होय! गंगाराम सुर्वे नावाच्या हवालदाराला सापडलेला हा अनाथ मुलगा, काव्यक्षेत्रातील सूर्य म्हणून पुढे नावारूपास येईल, असे कुणालाही वाटले नसेल. नारायण सुर्वे यांचा काव्यगोतावळा आजही गरीब, कामगार, शोषित, पीडित आणि वेदनांकित वस्तीमध्ये सापडतो. सुर्वे यांची कविता शोषितांची कविता म्हणूनच ओळखली जाते. त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारा स्त्रीविषयक विचार फार िंचतनीय आणि तितकाच आश्वासक असा होता. या कवितेतून व्यक्त होणारी स्त्री, कामगार, कष्टकरीवर्गातील असणार, हे ओघाने आलेच. त्याचबरोबर ती कामगार पुरुषासाठी सहकारी जीवनातील आश्वासक शक्ती म्हणूनही पुढे येताना दिसते. कदाचित नारायण सुर्वे यांनी कामगार वस्तीमध्ये वावरताना त्यांना जाणवलेल्या आणि त्यांनी जवळून पाहिलेले अनुभव अधिक सजगपणे मांडताना सर्व कष्टकरी लोकांसोबत त्यांनी कवितेमधून मांडलेली कष्टकरी स्त्री वाचकाला नवीन अनुभूती देते.
 
‘आधीचे नव्हतेच काही आता आईदेखील नाही; अश्रूंना घालीत अडसर जागत होतो रात्रभर झालो पुरते कलंदर...’ आई जाण्याचे दुःख टिपताना एका कष्टकरी स्त्रीचे, जीवनप्रवास संपल्यावर पाच भावंडांनी एकमेकांना बिलगून चादर ओढून घेताना आईची माया पांघरणे, या विलक्षण आणि आर्त प्रतिमांमधून आई नावाच्या स्त्रीमुळे जीवनाला काय गती होती, ती नाही म्हटल्यावर काय परिस्थिती असू शकते? हे शब्दांत मांडताना नारायण सुर्वे एक शहारा आणणारा अनुभव वाचकास देतात. सुर्वे यांच्या कवितेतील स्त्री कष्टकरी आणि कामगार असली, तरी तिचे स्वाभाविक रूप घेऊन ती आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रेयसी अशा वेगवेगळ्या रूपातून समोर येत राहते. ‘गलबलून जातो तेव्हा’ या कवितेतून तर कवीने संसाररथाचा गाडा ओढताना होणारी दमछाक, पत्नीच्या आश्वासक आणि दिलाशाच्या प्रेमामुळे कशी दूर होते, याचे अगदी सजीव चित्रण केलेले दिसते. गरीब कामगारांच्या घरातील कर्त्या पुरुषाचे भयाण, पण वास्तव चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. ‘गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो, तुझ्या मखमली कवेत स्वतःस अश्रूसह झाकून घेतो. दिवसभर थकलेली तू तरीही चैत्रपालवी होतेस, कढ ऊतू जाणार्‍या दुधावर स्नेहमय साय धरतेस...’ अशा शब्दांतून पत्नीकडून मिळत जाणारा दिलासा, तिचे स्वतःचे कष्ट विसरून नवर्‍यासाठी पुन्हा समर्पण वृत्तीने पुढाकार घेणे, आदी संकल्पना डोळ्यांसमोर उभ्या राहात असतानाच, ‘किती वाळलात तुम्ही’ या वाक्यातून पीळ पाडणारी व्यथा समोर येते. कदाचित हा अनुभव प्रत्येकाने वेगवेगळ्या पातळीवर ऐकलेला असल्यामुळे, सहजीवनाचा उत्कृष्ट संवाद वाटतो आणि ही कविता प्रत्येकाला आपलीशी वाटते.

 
 
आपण आपले सामाजिक जीवन जगताना कवी म्हणतो, ‘आवडीने रांधलेला भात खावयास मी नसेन घरात, उद्याचे नवे रचाया बेत मी हजर असेल सभेत, उपाशीच वाट पाहू नको...’ अगदी शेवटच्या ओळीतून एका विलक्षण उंची गाठणार्‍या कवितेतून सुर्वे आपल्या सहचारिणीला जो मोलाचा सल्ला देतात ती खर्‍या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेची नांदी आहे, असे प्रखरतेने म्हणावेसे वाटते. आता ही समानता संसारगाडा ओढण्यासाठी, कामावर आणि रोजंदारीवर जातानाही असते. म्हणूनच कामावरून स्त्री परतल्यावर घरातील वातावरण कसे बदलते, ते सांगताना कवी म्हणतात, ‘खुराड्यातील जग माझे उठते गं कलकलून, तू येतेस जेव्हा दमून...’ कवितेतून स्त्रीरूप रेखाटताना साहित्यातील कवींनी अनेक बाबींचा विचार केला असला, तरी रेड लाईट भागात काम करणार्‍या स्त्रियांचे मनोविश्व व्यक्त करणारे धाडस फक्त नामदेव ढसाळ िंकवा नारायण सुर्वे असेच लोक प्रचंड ताकदीने आणि अश्लीलतेपासून संपूर्ण शब्दसृष्टी दूर ठेवत निर्मळपणे करू शकतात... नारायण सुर्वे यांनी नामदेव ढसाळ यांच्याप्रमाणे दाहक शब्द जरी वापरले नाहीत, तरीही आशय मात्र प्रचंड दाहकच होता. ‘नेहरू गेले त्यावेळची गोष्ट’ या कवितेमध्ये, पंडित नेहरूंना श्रद्धांजली म्हणून शरीरविक्रय करणारी स्त्री एक दिवसाची सुट्टी घेते, तिच्या दृष्टीने ती नेहरूंना भावपूर्ण श्रद्धांजली! सुर्वे यांच्या कवितेत, शरीरविक्रय करून नवर्‍याला पैसे पाठवणारी स्त्री भेटते. त्यातही त्या पैशातून मुलाला शिक्षण द्या, असे ती आवर्जून नवर्‍याला सांगते. ही सकारात्मक ऊर्जा नारायण सुर्वे यांच्या कवितेत सापडते. त्याचप्रमाणे एक गिर्‍हाईक आपल्याला लग्नाची मागणी घालत आहे, हेसुद्धा स्वतःच्या नवर्‍याला ती बिनदिक्कत सांगते, ‘ह्ये कातडं लयी वंगाळ बगा, माणूस गोचिडीवानी चिकटतं आन कायबी बोलून जातं; पुरुस जातीच मला हसुबी येतं अन रडुबी येतं बगा...’ या ओळीतूनच तमाम पुरुषी समाजाचे नागडे वास्तव नारायण सुर्वे यांनी दाखवले आहे.
 
अशीच एक दाहक कविता म्हणजे, ‘तुमचंच नाव लिवा!’ या कवितेमधील वेश्यावृत्तीची एक स्त्री स्वतःच्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी जाते आणि ‘कंच्याबी देवाचं नाव नगा लिहू माणसाचंच लिवा, देवानं काय केलं हो? वटी तेनंच भरली ना ही’ असं सांगून माणसाचं पाप देवाच्या माथी मारण्याचे असामान्य सत्य, असे तत्त्वज्ञान नारायण सुर्वे यांची कविता सांगून जाते. ‘कुटुंब’ या कवितेत, गरिबीमुळे एकच वस्त्र असल्यामुळे पाहुण्यांसमोरही निर्वस्त्र झोपणार्‍या सासू आणि सुना सोशीकपणाच्या मूर्तिमंत प्रतिमा आहेत, की हरवलेल्या अर्थव्यवस्थेची पराभूत मानसिकता? असा प्रश्न सुर्वेंची कविता वाचताना पडतो. ‘माझ्या देशाच्या नोंद बुकात माझा एक अभिप्राय’ या कवितेत सुर्वे नोंदवतात तो अभिप्राय असा- ‘स्त्री : केवळ एक मादक आणि उत्तेजक पदार्थ हाच आजच्या कुलीन नजरेतील बघण्याचा अर्थ, ती फुलवाल्या कडील एक पुडी, एक कुडी, एक गुडिया... ओह... हे देशा; मी शरमेनं दबून चाललोय.’ एकंदरच भारतीय समाजातील स्त्रियांचे दुर्लक्षित व शोषित असे जीवन सुर्वे यांनी आपल्या कवितांमधून मांडले आहे. मात्र, प्रसंगी स्त्रियांचा करारी स्वाभिमान अधोरेखित करताना त्यांचे शब्द कमी पडत नाहीत. ‘तेव्हा एक कर’ या कवितेत- ‘खुशाल दुसरा संसार थाट, हवे तर मला स्मरून िंकवा विस्मरून...’ असा स्पष्ट सल्ला देणारा कवी सूर्यकुळातील असून, आपल्या सहचारिणीनेही देव-धर्म याचे अवडंबर नाकारले आहे, याची जाणीव ठेवणारा आहे. ‘ते रुद्राक्ष, पोथ्या, ते खुंटीवर टांगलेले देव, कालच म्हणालीस कुणीही भले केलेले नाही...’ अगदी स्पष्ट शब्दांत स्वतःबरोबर चालण्यास सांगणारा नायक, स्त्रीचे महत्त्व घेऊन जगाचे परिवर्तन घडविणारा जननायक आहे त्यामुळे समाजहित साधणारा आहे, याची जाणीव नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला करून दिली आहे. गरीब, कष्टकरी, कामगार प्रवर्गातील नारायण सुर्वे यांची कवितेतील स्त्री खरोखर प्रेरणादायी, आश्वासक आणि आपल्या अवतीभवती आढळणारी आहे, हेच नारायण सुर्वे यांच्या कवितेचे फलित आहे!