रुग्णाची श्रीमंती......
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपल्या जनधन योजनेबाबत बोलताना नेहमी म्हणतात, ‘या योजनेत माझ्या गरीब देशबांधवांची श्रीमंती प्रत्ययाला आली. शून्य रुपयात खातं देऊ केल्यावर देखील, त्यांनी पैसे जमा केले. त्यांचं सगळ्यांचं मिळून योगदान करोडो रुपयावर गेलं आहे. माझ्या देशाचा गरीब कुठलीही गोष्ट फुकट घेत नाही.’
 
गरिबांच्या या श्रीमंतीचा अनुभव आम्हा वैद्य लोकांना रोजच्या व्यवसायात कैक वेळा येतो. उषाताई त्यातल्याच. त्या पूर्वी भांडी घासायच्या. ठराविक साचाच्या गोष्टीप्रमाणे त्यांचा नवरा दारू प्यायचा, जुगारात कर्ज करून ठेवायचा, पडायचा... त्याच्यावर बरेच पैसे खर्च व्हायचे. त्यात पदरी मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवर दोन मुली. इच्छा असून त्या मुलाला फार शिकवू शकल्या नाहीत. पण सध्या तो पोटापुरतं कमावतो, आईला सांभाळतो आणि मुख्य म्हणजे निर्व्यसनी आहे. उषाताईंच्या इतक्या बिकट परिस्थितीत देखील त्यांनी माझ्याकडून कधीही फुकट औषध नेलं नाही. मी दिलं, ‘‘तरी पैसे घ्या’’ म्हणून हटून बसायच्या. ‘‘दुसरीकडे गेले असते तर द्यावेच लागले असते ना पैसे? आणि तुम्हाला तरी औषधं विकतच घ्यावी लागतात ना? फुकट घेतलं तर गुण येत नसतो बघा!’’ असं म्हणून स्वत:च्या मनानं काही रक्कम टेबलवर ठेवायच्या. ती जास्तच असायची. मग मी त्यातले पैसे परत करायचे. एखद्या वेळी त्यांच्याकडे पैसे नसले तर दुसर्‍या वेळी आठवणीनं द्यायच्या. कुठलीही तपासणी िंकवा पंचकर्म करायला सांगितलं तर पैसे नाहीत, ही सबब त्यांनी कधीच सांगितली नाही. आता त्यांचा मुलगा देखील आईचे उपचार करताना हयगय करत नाही. मुलाच्या आर्थिक परिस्थितीचं रडगाणं त्या देखील कधी गात नाहीत. ‘‘आपल्या जिवाला बरं वाटलं तर पैसा उपयोगाचा. नाहीतर काय चाटायचाय? की वर घेऊन जायचाय बरोबर?’’ असं त्यांचं साधं-सरळ तत्त्वज्ञान आहे. माझ्याकडे येणार्‍या इतर श्रीमंत रुग्णांच्या वागणुकीच्या तुलनेत मला या कुटुंबाचं खूप कौतुक वाटतं.

 
 
याउलट काही श्रीमंत रुग्ण! लाखभर पगार असतो, पण कन्सल्टिंगसाठी आमचा तब्बल एक तास मटकावल्यावरदेखील ‘‘पैसे कमी करा’’ म्हणून तोंडं वेंगाडतात. वर्षा ही माझी रुग्णा दहा हजारांच्या खाली साडी घेत नाही. पण औषधाचे पाचशे रुपये हमखास नसतात तिच्याकडे. पुढच्या वेळी औषधाला येताना फक्त आधीचे पाचशे असतात, पुन्हा बाकी ठेवते. बरं बाकी राहिल्याची आठवण स्वत: अजिबात ठेवत नाही. माझ्या कम्पाऊंडरनं आठवण दिली तर ठीक, नाहीतर बरंच आहे. (त्या कम्पाऊंडरला ती तिची नवी खरेदी नेहमी हौशेनं दाखवत असते. त्यामुळे तिनं पैसे बाकी ठेवले की कम्पाऊंडर माझ्याकडे तणतण करते.) कुठल्याही आवश्यक तपासण्या, पंचकर्म सांगितलं (जे मी फारच क्वचित सांगते) की हिचं पैशांचं रडगाणं सुरू! आजार वाढवणार्‍या- हॉटेल, मॉल, पर्यटन, पार्ट्या, समारंभ, रिसोर्ट कशावरही ती हजारो रुपये खर्च करू शकते. पण स्वत:चा आजार बरा करून घ्यायला मात्र हात आखडता असतो.
 
खरं तर रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची िंकवा वाईट असेल तर मी स्वत:च पैसे खूप कमी करून सांगते, कधी सांगत देखील नाही. (खुपसे आयुर्वेदाचे वैद्य हेच करतात हे मला माहीत आहे. शिवाय ते पथ्यापथ्य, योगासनं, प्राणायाम याद्वारे आरोग्याचं रक्षण करायला शिकवतात हे अॅडिशनल बेनिफिट असतं.) तरी काही ज्येष्ठ रुग्ण असमाधानी असतात. मुलं देशात/परदेशात मोठ्यामोठ्या पदावर असलेले ज्येष्ठ म्हणतात, ‘‘पैसे कमी घ्या! आम्हाला मुलांकडे मागायला लाज वाटते.’’ एकदा माझ्या कामवाल्या मावशींनी हे वाक्य ऐकलं. रुग्ण गेल्यावर त्या मला करवादून म्हणाल्या, ‘‘आपल्याच पोराला मागताना लाज वाटायला हवी की डॉक्टरला? हे काय बाई वेगळंच?’
हे सांगायचं कारण म्हणजे, ‘अष्टांग हृदय’ या आयुर्वेदाच्या ग्रंथात, पहिल्याचा अध्यायात रुग्णाकडे कुठले गुण असणं आवश्यक आहे, याचं वर्णन केलं आहे. त्यातला पहिला गुण आहे श्रीमंती! विद्यार्थी दशेत पहिल्यांदा हे वाचलं होतं तेव्हा वयाप्रमाणे आश्चर्य वाटलं होतं. मात्र ते किती योग्य आहे, हे आत्ता कळतं. इथे आर्थिक परिस्थिती या अर्थानं श्रीमंती अपेक्षित नाही. तर आरोग्यासाठी खर्च करण्याची तयारी या अर्थाची श्रीमंती अपेक्षित आहे. खर्च करताना आरोग्याला प्राधान्य असणं अपेक्षित आहे.
भारंभार कपडे-खोटे दागिने-चपला, दर सहा महिन्यांनी महागडा मोबाईल, दर तीन वर्षांनी गाडी, दर पाच वर्षांनी लाखोचं फर्निचर आणि सात वर्षांनी करोडो रुपयांचं घर बदलणारे लोक-हजार/पाचशे रुपयासाठी आजार अंगावर काढतात (आणि पुढे तो वाढला की मोठ्या रुग्णालयात लाखभर रुपये खर्च करतात) हे आश्चर्य नाही तर दुसरं काय?
अस्सा रुग्ण सुरेख बाई, कंजूस नसावा।
त्याचा आजार त्याने बाई, लवकर बरा करावा।।