डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
लातूर,
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ क्षेत्र संघचालक राहिलेल्या डॉ. कुकडे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे.
 
 
मूळचे पुणे येथील डॉ. अशोक कुकडे यांनी १९६४ मध्ये आरोग्य सेवेसाठी लातूर निवडले. तत्पूर्वी डॉ. कुकडे यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज येथे झाले. ते एमबीबीएसला सुवर्णपदक विजेते होते. अन् एमएसमध्येही सर्वप्रथम आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात सेवा देण्याचा निश्चय डॉ. कुकडे यांनी केला. त्यांच्यासोबत पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. भराडिया, डॉ. आलूरकर लातूरला आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. ज्याचा विस्तार विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र असा झाला आहे.
 
सामाजिक जाणिवेतून संघटित वैद्यकीय सेवा पुरविण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानने लातूरमध्ये केला. याच दरम्यान डॉ. कुकडे यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संघचालक म्हणून काम पाहिले. अलिकडच्या काळात कॅन्सर उपचारही ग्रामीण भागात अत्यंत कमी दरात मिळावेत, यासाठी डॉ. कुकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कॅन्सर केअर सेंटर उभारले. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय उभारलेले देशातील एकमेव कॅन्सर केअर सेंटर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानमुळे ग्रामीण भागात सेवेत आले.
डॉ. अशोक कुकडे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती या शिक्षण संस्थांचेही अध्यक्षपद भूषविले असून, आजही सामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी ते तत्पर आहेत. सुरुवातीला डॉक्टरांनी लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालयाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम उभं केलं. त्यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद रुग्णालयाचा आता चांगलाच विस्तार झाला असून त्यांच्या पुढाकाराने लातूरमध्ये कॅन्सर रुग्णालयाचीही स्थापना झाली आहे.
जनकल्याण निवासी विद्यालय, संवेदना सेरेबल पाल्सी केंद्र अशा संस्थाही डॉ. कुकडे यांच्या प्रेरणेतूनच उभारण्यात आल्या आहेत. या संस्थांची गणना नावाजलेल्या संस्थांमध्ये होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरील जबाबदारी होती. चार राज्याचा सहभाग असलेल्या संघाच्या पश्चिम विभागीय समितीचे ते प्रमुख होते.
Tags: