गांधीशरण कॉंग्रेसचे बोथट प्रियांकास्त्र!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
नाही नाही म्हणता पंडित जवाहरलाल नेहरू यांची पणती, इंदिरा गांधींची नात, सोनिया आणि राजीव गांधींची मोठी कन्या आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भगिनी प्रियांका वढेरा-गांधी यांनी राजकारणात पाऊल ठेवले. आजवर ते नव्हते का? याचे उत्तर नकारात्मक असले, तरी अधिकृत रीत्या त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. काल ते झाले. त्यांच्यावर पूर्व उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व उत्तरप्रदेशातील लोकसभेचे 40 मतदारसंघ त्यांच्या अखत्यारित येणार आहेत. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची जाहीर घोषणा जरी आजवर केली गेली नसली, तरी पडद्यामागून अनेक निर्णयांवर प्रियांकांची छाप राहात आलेली आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक राहिलेली आहे. सोनिया गांधी यांच्या आजारपणानंतर राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपवायची की नाही, याबाबत जेव्हा अंतिम निर्णय घ्यायचे ठरले त्या वेळीही प्रियांकांचा शब्द मानला गेला. उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये प्रचार असो की, राहुलच्या शाळा-कॉलेजच्या प्रवेशाबाबतचा निर्णय, कौटुंबिक आघाडीवर मोठी बहीण म्हणून प्रियांकाने जबाबदारी पार पाडली आहे. आता तर त्यांनी अधिकृत रीत्या पक्षाचे पदच स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षसंघटना मजबूत करण्याची आणि पक्षाला निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्याची जबाबदारी येणार आहे. आजवर जशा पळवाटा काढल्या जायच्या तशा त्यांना यापुढे काढता येणार नाहीत. पक्ष विजयी झाला तर त्याची फळेदेखील त्यांना चाखता येणार आहेत आणि पराभूत झाल्यास लोकांच्या टीकेचे धनीदेखील व्हावे लागणार आहे.
 
 
 
प्रियांका वढेरा-गांधी यांची नियुक्ती होताच कॉंग्रेसमध्ये चैतन्याची लहर पसरली आहे. आणि स्वाभाविकही आहे ते. कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसला आजवर फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. लोकसभेच्या आणि निरनिराळ्या राज्य विधानसभांच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा वारंवार पराभव झालेला आहे. फक्त मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील नजीकच्या काळातील विजयाचा अपवाद वगळता, इतर राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने सपशेल आपटी खाल्लेली आहे. राहुलच्या नेतृत्वातील पराजयामुळे पक्ष अजून रसातळाला जाऊ नये, त्याचे लोकसभेतील संख्याबळ घटू नये म्हणून ही निवड केली गेली आहे, हे तेवढेच खरे. प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा होताच, कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. कपिल सिब्बल यांनी तर, मोदीजी आणि शाह यांनी कॉंग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली आहे, पण आता प्रियांकांच्या राजकारणातील प्रवेशाने वाराणसी मोदीमुक्त आणि गोरखपूर योगीमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पण, कपिल सिब्बल यांची ही वल्गनाच म्हणावी लागेल. कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाने देशाच्या राजकारणात इतका मोठा बदल- तोही महिन्या दोन महिन्यांत- शक्य वाटत नाही. मान्य आहे प्रियांका गांधी दिसायला आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्या आहेत. पण, इंदिरा गांधींचे नेतृत्व खंबीर होते, त्यांना पक्षातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता होती. तसे कुठलेच गुण आजवर प्रियांकांमध्ये दिसून आलेले नाहीत.
 

 
 
प्रियांकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये घराणेशाहीने डोके वर काढले आहे. एकीकडे मोदी, शाह आणि भारतीय जनता पार्टीची नेतेमंडळी कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा देत आहेत आणि ही मंडळी या दोघांनाच लक्ष्य करायला निघाली आहे. कॉंग्रेसमुक्त भारताचा उद्देश कॉंग्रेसजनांनी समजून घेण्याची गरज आहे. देशाला परिवारवादाच्या जोखडातून मुक्त करणे, जी हुजुरीतून मुक्त करणे, देशाच्या विकासाच्या दृष्टीने पावले टाकणे, देश स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे, विकासाच्या मार्गाने वाटचाल करणे, भयमुक्त समाजनिर्मिती करणे, दहशतवादावर अंकुश आणणे... अशा कितीतरी परिभाषा कॉंग्रेसमुक्तीबाबत सांगता येऊ शकतील आणि त्यासाठी मोदी आणि शाह झटत आहेत. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापाठोपाठ झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत लोकांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी कॉंग्रेसला सत्ताच्युत करून भारतीय जनता पार्टीला अनेक राज्यांमध्ये सत्तेवर बसविले. तोच कॉंग्रेसमुक्तीचा नारा पुढेही चालवण्याचा भाजपाचा निर्धार आहे.
 
 
 
राहुल गांधींच्या अध्यक्षपदामुळे जे साध्य झाले नाही, ते साध्य करण्यासाठी कॉंग्रेसने प्रियांकांच्या निमित्ताने ब्रह्मास्त्र अर्थात प्रियांकास्त्र बाहेर काढले आहे. पत्त्यांच्या खेळात अशा खेळीला हुकमाचा एक्का टाकणे असे म्हटले जाते िंकवा क्रिकेटच्या भाषेत गुगली टाकणे असे म्हटले जाते. पण, ही गुगली आणि हुकुमाचा एक्का तेव्हाच काम करणार आहे, जेव्हा त्याला पक्षातील वातावरण पूरक ठरणार आहे. तसे वातावरण पक्षात आहे काय? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. कारण कॉंग्रेसचे नेतृत्व म्हणजे राहुल गांधी यांच्या अपयशाची प्रचीती आल्यामुळे, उत्तरप्रदेशातील युतीपासून मायावती आणि अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला दूर सारले आहे. तशीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे. भाजपाविरोधी असलेली तेलंगणा राष्ट्र समिती, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हे पक्ष कॉंग्रेसपासून फटकून आहेत. पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष कॉंग्रेस आणि तृणमूलला जवळ घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत कॉंग्रेससाठी प्रियांकांसाठी अनुकूल वातावरण कसे म्हणता येईल? प्रियांकांचा अर्थात ब्रह्मास्त्राचा वापर कॉंग्रेसला भाजपासह उत्तरेतील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासहित सोबत नसणार्‍या प्रादेशिक शक्तींविरोधातही करायचा आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती लक्षात घेता, त्यांच्या जागी रायबरेलीतून प्रियांका लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. एकीकडे गांधी परिवार कॉंग्रेसचा मालक असल्याची टीका होत असतानाच, पक्षाने प्रियांकाला राजकारणात आणल्यानंतरही कॉंग्रेस कार्यकत्यार्र्ंकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होणे, हे या पक्षाच्या परिवारवादी मानसिकतेचेच लक्षण असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. भाजपाने तर त्यांची नियुक्ती राहुलच्या अपयशामुळेच करावी लागली असून, हा राहुल गांधी यांचा पराभव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
प्रियांकांना स्वपक्षीयांकडून धोका नसला, तरी त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केलेल्या जमीन घोटाळ्यामुळे त्या अडचणीत येऊ शकतात. रॉबर्ट वढेरा यांचे त्यांच्या शरीरयष्टीशिवाय दुसरे कुठलेही कर्तृत्व आजवर दिसलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक प्रतिमेमुळे त्यांना नुकसानच सहन करावे लागण्याची शक्यता आहे. हरयाणातील जमीन घोटाळा आणि बनाना रिपब्लिक अशा वक्तव्यांनी 2014 मध्ये रॉबर्ट वढेरा यांनी कॉंग्रेसला अधिक अडचणीत आणले होते. खिशात एक लाख रुपये असलेला एक अल्पशिक्षित युवक तीन वर्षांत साडेतीनशे कोटींचा मालक कसा होतो? हादेखील प्रश्नच आहे. तीन राज्यांत मिळालेला विजय खरेतर कॉंग्रेसमध्ये चैतन्य आणणारा ठरला आहे. त्यात प्रियांकास्त्र सोडून कॉंग्रेसने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आहे. आज त्या ऊर्जेचा योग्य वापर झाला तरच प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाचा कॉंग्रेसला फायदा होणार आहे. अन्यथा राहुलप्रमाणेच त्यांच्याही मागे अपयशाचे शुक्लकाष्ठ लागून प्रियांकास्त्र बोथट झाल्याशिवाय राहायचे नाही!