नागपूर जिल्ह्यात गारांचा पाऊस - कोदामेंढीत मिरची, गहू पिकाचे नुकसान - हिंगणा तालुक्यात चणा, संत्री, मोसंबीला तडाखा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
मौदा,
मागील महिन्यात असलेली थंडीची लाट ओसरली की काय, असे वाटत असतानाच गुरुवार, 24 जानेवारी रोजी अचानक रात्री गारांसह पाऊस बरसला आणि थंडीची स्थिती पूर्ववत्‌ झाली. गारांसह आलेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वातावरण एकदम बदलले. सायंकाळनंतर मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे जणू गारांचा पाऊस झाल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मिरची, गहू, कापसाचे नुकसान झाले. शुक्रवारीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोदामेंढी परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. तसेच सिरसोली, खात या भागातही गारांचा पाऊस झाला. शेतात, अंगणात, रस्त्यावर गारांचा खच होता. अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खात परिसरातील देवमुंढरी, सिवनी येथे जोरदार पावसासह गारपीट झाली. हाती आलेले पीक गारांनी अक्षरश: धुऊन काढले. शेतात काम करणार्‍या मजुरांची तारांबळ उडाली. मिळेल तेथे त्यांनी आश्रय घेतला. शेतातील पिकाचे असे डोळ्यासमोर नुकसान होताना अनेक शेतकर्‍यांनी पाहिले. या गारांच्या तडाख्याने अनेक मजूर जखमी झाल्याचीही माहिती आहे.
 

 
 
हिंगणा तालुक्यातील टोकावरील कान्होलीबारासह काही गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून शेतातील गहू, चणा, संत्रा, मोसंबी व पालेभाज्यांचे नुकसान झाले.