अनिलकुमार नाईक, बळवंत पुरंदरे यांना पद्मविभूषण -112 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान-अमरावतीचे रवींद्र व स्मिता कोल्हे यांना पद्मश्री
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
नवी दिल्ली,
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी क्षेत्रातील पद्म पुरस्कार आज शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यात अनिलकुमार मणिभाई नाईक आणि बळवंत उपाख्य बाबासाहेब मोरेश्वर पुरंदरे यांना पद्मविभूषण, डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे यांना पद्मभूषण आणि अमरावतीच्या मेळघाट येथे समाजसेवा करणार्‍या रवींद्र व स्मिता कोल्हे या डॉक्टर दाम्पत्याला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 

 
 
सामाजिक कार्य, लोक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यकीय, साहित्य व शिक्षण, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रत्येक वर्षी पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. या वर्षी एकूण 112 पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, चौघांना पद्मविभूषण, 14 मान्यवरांना पद्मभूषण आणि 94 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात 21 महिलांचा समावेश असून, 11 अनिवासी भारतीयही आहेत. यातील तिघांना मरणोत्तर हा सन्मान दिला जात आहे. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये छत्तीसगडच्या लोकसंगीत गायिका तीजन बाई, जिबोटी येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माइल ओमर गुल्लेह यांचाही समावेश आहे.
 
 
पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी, दीनयार कॉंट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, थिएटर व नाट्यभूमी कलावंत वामन केंद्रे, संगीतकार व गायक शंकर महादेवन्‌, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील नगिनदास संगवई, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे.