प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न - नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना मरणोपरान्त
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
नवी दिल्ली,
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भारतीय जनसंघाचे दिवंगत नेते आणि भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व चंडिकादास अमृतराव उपाख्य नानाजी देशमुख आणि महान गायक भूपेन हजारिका यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज शुक्रवारी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोपरान्त प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
 
 
प्रणव मुखर्जी हे 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 या काळात देशाचे राष्ट्रपती होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्‌वट करून मुखर्जी यांचे अभिनंदन केले. सोबतच त्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. प्रणवदा हे आमच्या काळातील सर्वात महान मुत्सद्दी आहेत. त्यांनी निस्वार्थ भावनेतून आणि निरंतर अनेक दशकांपर्यंत देशाची सेवा केली आहे. देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व असेच आहे, असे टि्‌वट पंतप्रधानांनी केले आहे.
 
 
पंतप्रधानांनी भूपेन हजारिका यांचेही स्मरण केले. हजारिका यांचे गीत आणि संगीत सर्वच पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय संगीत विदेशातही लोकप्रिय केले. भूपेनदांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 
 
नानाजी देशमुख यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जे योगदान दिले, त्यामुळेच गावपातळीवरील जनजीवन बदलले आहे. ग्रामीण जनता सक्षम झाली आहे. नव्या पिढीला त्यांनीच विकासाचा मार्ग दाखविला. त्यांची मानवता, प्रेम आणि जनसेवा अद्वितीय अशीच आहे. ते खर्‍या अर्थाने भारतरत्न आहेत, असे टि्‌वट पंतप्रधानांनी केले आहे.
 
प्रणव मुखर्जी यांचा परिचय
प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. 1969 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन िंसग यांच्या कार्यकाळात त्यांनी देशाचे अर्थमंत्रिपद भूषविले आहे. तर, पी. व्ही. नरिंसहराव यांच्या कार्यकाळात ते परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. मनमोहन िंसग यांच्या काळात त्यांनी दोन वर्षे संरक्षणमंत्रिपदही भूषविले होते.
नानाजी देशमुख यांचा परिचय
नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी झाला, तर 27 फेब्रुवारी 2010 रोजी त्यांचे निधन झाले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. िंहगोली जिल्ह्यातील कडोळी गावी जन्मलेल्या नानाजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जनसेवेला सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका पार पाडली. वाजपेयी सरकारच्या काळात ते राज्यसभेवर मनोनित झाले होते. राजकारण व सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेर त्यांनी शाश्वत विकास साधणारे समाजकार्याचे व्रत स्वीकारले.
भूपेन हजारिका यांचा परिचय
भूपेन हजारिका (8 सप्टेंबवर 1926 ते 5 नोव्हेंबर 2011) आसाममधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक होते. ते कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे गाढे अभ्यासकही होते. हजारिका यांचा जन्म आसामच्या तिनसुकीया जिल्ह्यातील सदिया गावात झाला. 1946 मध्ये हजारिका यांनी बनारस िंहदू विद्यापीठातून राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर न्यू यॉर्कमधील कोलम्बिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने, तर 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2011 मध्ये त्यांचा पद्मभूषण पुरस्कारानेही गौरव करण्यात आला होता.