निवडणूक आयोगावर विश्वास ठेवा;रविशंकर प्रसाद यांचे आवाहन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
नवी दिल्ली:
 
आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन्सचाच (ईव्हीएम) वापर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज शुक्रवारी समर्थन केले. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. या घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेचा सन्मान करा, असे आवाहन प्रसाद यांनी केले.
 
 

 
 
 
आता मतपत्रिकेच्या युगात परत जाणार नाही. पुढील प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचाच वापर होईल, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी गुरुवारी केले होते. याच अनुषंगाने रविशंकर प्रसाद यांनी आपली भूमिका सादर केली.
या विषयावर मला राजकीय भाष्य करायचे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की, याच ईव्हीएमच्या मतदानाने २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला विजय दिला होता आणि याच ईव्हीएमने भाजपाला अलीकडेच तीन मोठ्या राज्यांमध्ये पराभूतही केले आहे. या कालावधीत झालेल्या अनेक पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला पराभवाचाच सामना करावा लागला होता, त्यावेळी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला नव्हता, असे प्रसाद यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पष्ट केले. निवडणूक आयोगातर्फे आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोिंवद आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे देखील उपस्थित होते.
 
या नव्या तंत्रज्ञानावर ज्या प्रमाणे निवडणूक आयोगाने विश्वास ठेवला, तोच विश्वास आपणही या तंत्रज्ञानावर आणि प्रामाणिकपणे निवडणुका हाताळणार्‍या आयोगावर ठेवायला हवा, असे माझे ठाम मत आहे. भारतातील निवडणुका आणि त्या हाताळण्याच्या पद्धतीचे संपूर्ण जगात कौतुक होत असते. अनेक देश निवडणूक हाताळण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी भारताचे सहकार्य मागत असतात. त्यामुळे आपल्या निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवू नका, असे प्रसाद यांनी सांगितले.