'भारत' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
मुंबई:
'दबंग' अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या त्याच्या आगामी 'भारत' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमीवर आलेला हा टीझर उत्सुकता निर्माण करणारे  असून चाहत्यांना काहीतरी जबरदस्त पाहायला मिळेल अशी आशा आहे.

 
 
खुद्द सलमान खानने  ट्विटरवरून टीझरची माहिती दिली. 'भारत'ची कथा स्वातंत्र्योत्तर काळातील आहे. त्यामुळंच 'टीझर'साठी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीचा मुहूर्त साधण्यात आल्याचं बोललं जातंय. यात कतरीना कैफ, दिशा पटानी, तब्बू व जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. मात्र, टीझरमध्ये फक्त सलमानलाच दाखवण्यात आलंय. टीझरची सुरुवात सलमानची धमाकेदार एन्ट्री आणि जबरदस्त संवादाने होते. वेगळ्याच लूकमधून सलमान प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं टीझरमधून दिसतंय. काही मिनिटांतच हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याबरोबर #BharatKaTeaser हा हॅशटॅगही ट्रेंड होतोय. अली अब्बास जफर यांनी 'भारत'चं दिग्दर्शन केलं आहे. 'भारत' हा २०१४ मध्ये आलेल्या 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.