टीसीएस जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आयटी ब्रँड
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
न्यूयॉर्क :
 
भारताच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने २०१८-१९ मध्ये जगातील सर्वाधिक मूल्य असणाऱ्या आयटी सर्व्हिसेस ब्रॅंडमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. ब्रॅंड फायनान्सने एक आंतरराष्ट्रीय अहवाल सादर केला आहे, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. जगातील नंबर वन आयटी ब्रॅंड असण्याचा मान अॅक्सेंचर या कंपनीने पटकावला असून जगप्रसिद्ध आयबीएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील टॉप दहा आयटी सर्व्हिसेस ब्रॅंडच्या यादीत चार भारतीय आयटी सर्व्हिसेस कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. यात टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो या चार भारतीय कंपन्या आहेत.
 
 

 
 
पहिला क्रमांक पटकावणाऱ्या अॅक्सेंचरचे ब्रॅंड मूल्य २६.३ अब्ज डॉलर इतके आहे. याआधी क्रमांक एकवर असलेल्या आणि आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयबीएमचे ब्रॅंड मूल्य २०.४ अब्ज डॉलर तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या भारताच्या इन्फोसिसचे ब्रॅंड मूल्य १२.८ अब्ज डॉलर इतके आहे. टीसीएसने बाजारातील डिजीटल सेवांच्या गरजावंर लक्ष केंद्रित केल्याने त्याच्या ब्रॅंडचे मूल्य वाढले आहे. जपानी बाजारपेठेत यश मिळवणारी टीसीएस ही पहिली भारतीय आयटी कंपनी आहे. विप्रोने पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये जागा पटकावली आहे. विप्रोच्या ब्रॅंड मूल्यात २५ टक्क्यांनी वाढ होऊन ते ४ अब्ज डॉलरवर पोहचले आहे.
अमेरिकेच्या कॉग्निझंट (चौथे) आणि इन्फोसिसने (पाचवे) मागील वर्षाचेच स्थान राखले आहे. टॉप टेन आयटी ब्रॅंडमध्ये केपजेमिनी, डीएक्ससी टेक्नॉलॉजी आणि एनटीटी डेटा या इतर कंपन्या आहेत. २०१८ हे टीसीएससाठी ऐतिहासिक वर्ष होते. याच वर्षी कंपनीने पाच दशकांचा कालावधी पूर्ण केला आहे.