परिपक्व लोकशाहीचा परिमळ!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :26-Jan-2019
भारताचा राज्यकारभार करण्यासाठी ब्रिटिश संसदेने तयार केलेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935 बदलून त्याजागी स्वतंत्र भारताचे स्वत:चे संविधान लागू होण्याला 26 जानेवारी 2019 रोजी 69 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात भारतात परिपक्व व शाश्वत लोकशाही प्रस्थापित केल्याबद्दल समस्त भारतीय अभिनंदनास पात्र आहेत. 1975 साली हुकूमशाही वृत्तीच्या इंदिरा गांधी यांनी आपली पंतप्रधानपदाची खुर्ची वाचविण्यासाठी, सर्व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून देशावर आणिबाणी लादली होती. निवडणुकीत प्रचंड भ्रष्टाचार करून इंदिरा गांधी निवडून आल्या होत्या. ते आरोप उच्च न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे त्यांची निवडणूक न्यायालयाने रद्द ठरविली होती. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान न करता, इंदिरा गांधी यांनी बेदरकारपणे संपूर्ण भारतावर आणिबाणी लादून, विरोधी मतांच्या लोकांवर अत्याचार केलेत. त्यांना तुरुंगात डांबले. लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा हा प्रकार, भारतीय जनतेने मतदानाच्या माध्यमातून झिडकारला होता. या एका कृतीने भारतीय जनतेने लोकशाहीप्रती आपली अनन्य निष्ठा व परिपक्वता सार्‍या जगाला दाखवून दिली होती. या अशाच लोकांच्या ठाम पाठिंब्यामुळे भारतात लोकशाही प्रस्थापित होऊ शकली, हे मान्य करावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्यासोबतच निर्मित झालेल्या पाकिस्तानने लोकशाही तर स्वीकारली, परंतु ती तिथे रुजलीच नाही. आजही हा देश लोकशाहीचे वस्त्र पांघरून आहे, परंतु ते वस्त्र किती विरलेले आहे, याचा अनुभव सारे जग घेत आहे. त्यावरून कुणी असा निष्कर्ष काढत असेल की, भारतात िंहदू बहुसंख्य असल्यामुळेच इथे लोकशाही रुजू शकली, तर तो चूक म्हणता येणार नाही. त्यामुळे आज समस्त िंहदूंचेही खास अभिनंदन करणे आवश्यक ठरते.
 
 
प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारून इतकी वर्षे झालीत, तरी या राज्यव्यवस्थेसमोरील आव्हाने संपलीत, असे मात्र म्हणता येणार नाही. नवनवीन आव्हानेही उत्पन्न होत आहेत. सर्वात मोठे आव्हान आहे, दहशतवादाचे. यात नक्षलवादही समाविष्ट आहे. या दोन्ही िंहसक व क्रूर दानवी वृत्तींनी भारताला रक्तबंबाळ केले होते. आज काश्मीर व मध्य भारतातील काही क्षेत्र सोडले, तर भारतात या वृत्तींना यशस्वीपणे ठेचून काढण्यात आले आहे. याचा सार्वजनिक चर्चेत कुठे उल्लेख होत नाही. पत्रकार, राजकीय विचारवंत, विश्लेषक यांच्या दुर्दैवाने, अंतर्गत सुरक्षेची ही सुखद स्थिती, भाजपा सरकारच्या काळात आणि त्यातही संघ स्वयंसेवक असलेल्या गृहमंत्री राजनाथिंसह यांच्या कर्तृत्वाने आली आहे. आत्मा, इमान विकलेल्या या मंडळींच्या थयथयाटाला न जुमानता भारतीय जनता भाजपा सरकारच्या धोरणांच्या मागे ठाम उभी राहिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. तिकडे काश्मिरातही एक सुखविणारी बातमी आहे. काश्मिरातील बारामुल्ला जिल्हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला समजला जातो. हा जिल्हा आता अतिरेकीमुक्त झाल्याची घोषणा भारतीय लष्कराने केली आहे. काश्मिरातील अस्थिर परिस्थिती वेगाने सामान्य होईल, याचाच हा शुभसंकेत मानला पाहिजे. नक्षलवाद्यांचेही मनोबल पूर्णपणे खच्ची झाले आहे. नोटबंदीमुळे नक्षल्यांचे आर्थिक स्रोत आटले आहेत. एकतर शरण येणे िंकवा सुरक्षा दलांकडून मारले जाणे, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे उरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाकडे केंद्राची सत्ता आल्यास, काश्मीरमधील दहशतवाद आणि मध्य भारतातील नक्षलवाद समूळ संपलेला आपल्याला दिसेल.
 
 
भारतीय संविधानाला आणि लोकशाहीला थेट धोका असलेले हे दोन्ही दहशतवाद, तसे पाहिले तर उघड उघड कार्यरत असतात. त्यांचे आव्हान भारतीय जनतेने सरकारसोबत यशस्वीपणे पेललेही आहे. परंतु, समाजात वावरणार्‍या छुप्या नक्षलवाद्यांचा कसा सामना करायचा, याबाबत मात्र अजूनही भारतीय जनता पुरेशी जागृत झालेली नाही, असेच म्हणावे लागेल. वेगवेगळी गोंडस नावे घेऊन ही शहरी नक्षली मंडळी आजही समाजात राजरोसपणे वावरत आहेत. महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्या, तरी त्यांचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यासाठी समाजानेच पुढाकार घेत या मंडळींचे बुरखे फाडण्याचे काम केले पाहिजे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण हा निश्चय करू या.
 

 
 
 
जगात आतापर्यंत भारताची ओळख, केवळ एक लोकशाही देश म्हणूनच होती. परंतु, गेल्या साडेचार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीमुळे व त्यांना जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे, भारत आता जगात एक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे. लोकशाही मूल्यांना आर्थिक शक्तीची जोड मिळाली आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत भारताने सहावे स्थान मिळविले आहे. ज्या इंग्लंडने दीडशे वर्षे भारताचे शोषण करून स्वत:ची समृद्धी वाढविली, तो इंग्लंड देश पाचव्या क्रमांकावर आहे आणि लवकरच भारत त्यालाही मागे टाकेल, असे बोलले जात आहे. आज जगात भारताच्या पासपोर्टला सन्मान प्राप्त झाला आहे. भारताच्या प्रतिष्ठेचा जगात इतका दबदबा झाला आहे की, भारताच्या प्रगतीने कुढणारे पाकिस्तानी नागरिकही परदेशात कुचेष्टा होऊ नये म्हणून स्वत:ची ओळख भारतीय म्हणून करून देऊ लागले आहेत. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेला देत असले, तरी खरे मानकरी तेच आहेत, हे निश्चित! आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने लक्षणीय यश मिळविले असले, भारताच्या म्हणण्याकडे सारे जग गांभीर्याने लक्ष देत असले, तरी भारत देशात मात्र या प्रगतीला बघून तोंड वाकडे करणारे काही कमी नाहीत. त्यांचाही आम्हाला व्यवस्थित समाचार घ्यावा लागणार आहे.
 
 
2014 साली भारतीय जनतेने आपले मत, भारताच्या विकासाला, आर्थिक स्थैर्याला दिले होते आणि नरेंद्र मोदी यांनी आपली पंतप्रधान म्हणून निवड किती योग्य होती, हे सिद्ध करून दाखविले आहे. आता परीक्षा जनतेची आहे. मारुतीच्या शेपटीप्रमाणे सतत वाढतच जाणार्‍या आमच्या भौतिक गरजांची पूर्ती होत नाही म्हणून आम्ही तोंड लटकवून बसणार की, देशाच्या प्रगतीला, समृद्धीला, आर्थिक स्थैर्याला आणि महत्त्वाचे म्हणजे आमच्या प्रजासत्ताकाला अधिक मजबूत व स्थायी करण्यासाठी सामूहिक संकल्पशक्ती दाखविणार? निवड आम्हाला करायची आहे. भारतीय जनता केवळ परिपक्वच नाही, तर त्या परिपक्वतेत सातत्य आहे, हे दाखविण्याची संधी 2019 च्या निवडणुकीच्या माध्यमातून येत आहे.
 
 
संविधानात कितीही थोर, उच्च विचार मांडले असले, तरी आमच्या आचरणात ते नसले तर त्या विचारांना काही अर्थ नसतो. ते विचार, ती मूल्ये आम्ही आचरणात आणली, तर भारताला विश्वगुरुपदी आरूढ होण्यापासून अडवू शकत नाही. भारताची आकांक्षा विश्वगुरुपदी आरूढ होण्याची आहे, जग पादाक्रांत करण्याची नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. दोन-अडीच हजार वर्षे जगातील सर्वांत श्रीमंत व समृद्ध देश म्हणून स्थान प्राप्त केले असतानाही, भारताने कधी दुसर्‍याच्या टीचभर जागेवरही अतिक्रमण केले नाही. हा इतिहास आहे. संपूर्ण चराचर सृष्टीचे उन्नयन, त्यांच्या सुखाची, त्यांच्या निरामयतेचीच इच्छा व तदनुसार आचरण भारताने केले आहे. त्यामुळेच समस्त सृष्टीसमोर आज जी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्यांना निरस्त करण्यासाठी भारताकडून जगाला खूप आशा आहे. ती आशा आम्हाला सर्व शक्तिनिशी पूर्ण करायची आहे...